बेळगाव उत्तर मतदार संघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी शिवबसवनगर, सैनिकनगर आदी परिसरात आपले बंधू माजी आमदार फिरोज सेठ तसेच शेकडो कार्यकर्त्यांसमवेत झंझावाती प्रचार मोहीम राबवली. लिंगायत समाजाच्या नेत्यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी बेळगाव उत्तर मतदार संघात प्रचारात जोरदार आघाडी घेत झंझावाती प्रचार सुरु केला आहे. त्यांनी सैनिकनगर, शिवबसवनगर आदी परिसरात शेकडो कार्यकर्त्यांसमवेत घरोघरी मतदारांशी संपर्क साधून मतयाचना केली. भाजप सरकारने काँग्रेसने सुरु केलेल्या अनेक कल्याणकारी योजना बंद करून गरिबांचे नुकसान केले आहे, त्यामुळे गोरगरिबांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी काँग्रेसला मते देऊन निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले. शिवबसव नगरात लिंगायत भवनात वीरशैव लिंगायत महासभेच्या महिला विभागाच्या अध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद यांची भेट घेऊन चर्चा करून समर्थन देण्याचे आवाहन राजू सेठ यांनी केले.

उपनगरी परिसरात प्रचार करताना राजू सेठ यांचे मतदारांनीही उत्स्फूर्त स्वागत केले. अनेक ठिकाणी कार्यकर्ते, रहिवाशांनी त्यांचे शाल, पुष्पहार घालून स्वागत करून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू सेठ म्हणाले की, आज सकाळी सैनिकनगर व नजीकच्या परिसरात प्रचार केला आहे. त्यानंतर शिवबसवनगर भागात प्रचार केला आहे. आता लिंगायत भवनात लिंगायत नेत्यांची भेट घेऊन समर्थन देण्याचे आवाहन त्यांना केले. सर्वत्र सर्वधर्मीय, सर्वभाषिक मतदारांचा चांगला, सकारात्मक पाठिंबा मिळत आहे. भाजप सरकारने काँग्रेसच्या अनेक कल्याणकारी योजना रद्द केल्या. गरिबांना रेशनवर मिळणार तांदूळ बंद केला. या सर्व योजना आणि गॅरंटी कार्डमध्ये जाहीर केलेल्या प्रत्येक कुटुंबाला दरमहा दोनशे युनिट मोफत वीज, गृहलक्ष्मी योजनेत कुटुंबप्रमुख महिलांना दरमहा दोन हजार रुपये, रेशनवर प्रत्येक कुटुंबाला दरमहा दहा किलो तांदूळ, सुशिक्षित बेरोजगारांना दोन वर्षांपर्यंत दरमहा तीन हजार बेरोजगारी भत्ता, सरकारी खात्यांमधील अडीज लाख पदांवर टप्प्याटप्प्याने नोकरभरती तसेच क्षीरभाग्य, विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आदी योजना काँग्रेस सत्तेवर आल्यास सुरु करणार आहे. त्यामुळे मतदारांनी काँग्रेसला निवडून द्यावे असे आवाहन राजू सेठ यांनी केले.
यावेळी राजू पाटील, विशाल यलीगार, विश्वनाथ यलीगार, सागर पाटील, प्रदीप चापगाव यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते, राजू सेठ यांचे समर्थक आदी उपस्थित होते.


Recent Comments