बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्यासाठी त्यांचे पुत्र अमान सेठ यांनी आज मतदारसंघात भव्य प्रचारमोहीम राबवली. स्थानिक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या मोहिमेत भाग घेतला.
बेळगाव उत्तरमधील बेळगाव नगरविकास प्राधिकरणाच्या (बुडा) कार्यालयाच्या बाजूस असलेल्या आसदखान हौसिंग सोसायटी कॉलनी परिसरात राजू सेठ यांच्या प्रचारार्थ आज मोहीम राबवण्यात आली. राजू सेठ यांचे पुत्र अमान सेठ यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेत मतदारांशी घरोघरी संपर्क साधण्यात आला. काँग्रेसच्या प्रचारपत्रकांचे वाटप करण्यात आले. बेळगाव शहराचा सर्वांगीण विकास करून शहरात शांतता, सौहार्द राखण्यासाठी काँग्रेसला निवडून देण्याचे आवाहन यावेळी मतदारांना करण्यात आले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्थानिक नगरसेविका रेश्मा भैरकदार यांनी सांगितलं की, आज बेळगाव महापालिकेच्या प्रभाग क्र. 12, 13 व 14 मध्ये काँग्रेस उमेदवार राजू सेठ यांच्यासाठी जोरदार प्रचार मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी मतदारांचाही चांगला प्रतिसाद लाभला असून त्यांनी राजू सेठ यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे वचन दिले आहे. काँग्रेसने मतदारांना जी पाच हमीपत्रे जाहीर केली आहेत, त्यामुळे सर्व मतदार काँग्रेसच्या बाजूने असून, राज्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल यात काही शंका नाही.
बेळगाव उत्तरमध्येही राजू सेठ यांना मतदारांकडून समर्थन मिळत आहे. त्यांनी अनेक वर्षांपासून समाजसेवा सुरु ठेवली आहे. कोविड काळात रुग्णांना कमीतकमी दरात औषधोपचार, अंजुमन संस्थेत कोविड रुग्णालय सुरु करून रुग्णसेवा केली. इतकेच नाही तर सर्व जाती धर्माच्या मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचे पुण्यकार्य केले. लोकांना टँकरने पाणी पुरवले, अन्नधान्य, रेशन पुरवून कोणी उपाशी राहणार नाही याची दक्षता घेतली. अंजुमन संस्थेच्या शाळेत अनेक गरीब विद्यार्थ्यांची फी माफ केली. त्यांचे ज्येष्ठ बंधू फिरोज सेठ यांनी आपल्या आमदारकीच्या काळात असंख्य विकासकामे केली. तर राजू सेठ यांनी समाजसेवा केली. त्यामुळे आम्हाला एकावेळी दोन आमदार मिळाल्यासारखे वाटते. त्यांच्या कार्यामुळे आणि अल्लाहच्या कृपेने राजू सेठ नक्की विजयी होतील असा विश्वास आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना कार्यकर्ता इयामी यांनी सांगितले की, कोविड काळात सगळे लोक घाबरून घरी बसून होते, तेंव्हा राजू सेठ यांनी मोठी समाजसेवा करून अनेकांचे प्राण वाचवले आहेत. अशा सेवाभावी नेत्याला निवडून देणे आमचे कर्तव्य आहे असे सांगितले.
युनूस मोमीन यांनी सांगितले की, आसदखान सोसायटी परिसरात फिरोज सेठ यांनी आमदार म्हणून अनेक विकासकामे केली. बेळगाव उत्तरमध्येही दर्जेदार रस्ते, गटारी, उद्याने, स्वच्छता आदी कामे करून त्यांनी विकास साधला आहे. राजू सेठदेखील त्यांच्याप्रमाणेच विकास करण्याच्या हेतून निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी यापूर्वीही मोठी समाजसेवा केली आहे. उत्तरमध्ये ते भरघोस मतांनी निवडून येतील याचा आम्हाला विश्वास आहे असे सांगितले.
या प्रहारमोहिमेत युवावर्गाला सहभाग लक्षणीय होता. त्याशिवाय ज्येष्ठ नागरिक, महिलादेखील सहभागी झाल्या होत्या. एकंदर, वाढते समर्थन पाहता राजू सेठ विजयाकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येते.


Recent Comments