election

भाजपने काय विकास केला हे जनतेला सांगावे : सिद्दरामय्या यांचे भाजपला खुले आव्हान

Share

विकासावर चर्चा करण्याचे धारिष्ट्य नसल्यानेच मुख्यमंत्री बोम्मई आणि भाजप नेते मी लिंगायतांचा अवमान केल्याची आवई उठवत आहेत. धारिष्ट्य असेल तर त्यांनी काय विकास केला हे जनतेला सांगावे असे खुले आव्हान विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या यांनी भाजपला दिले.

गोकाक येथे काँग्रेस उमेदवारी डॉ. महांतेश कडाडी यांच्या प्रचारासाठी आले असता, प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्दरामय्या म्हणाले की, मी केवळ मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे आजवरचे सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत असे बोललो होतो. त्याने लिंगायत समाजाचा अवमान कसा होतो? बोम्मई लिंगायत आहेत म्हणून लिंगायत समाजाचा अवमान होतो का? कर्नाटकात काँग्रेसची लाट आली आहे. जनादेश आमच्या बाजूने येणार असल्याने बोम्मई यांच्यासह भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. काँग्रेसला या निवडणुकीत 130 ते 150 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळेच लिंगायतांना माझ्या विरोधात उठवण्याचा प्रयत्न ते करत आहेत असा आरोप सिद्दरामय्यांनी केला.

लक्ष्मण सवदी अन जगदीश शेट्टर यांनी पक्षत्याग केल्याच्या पार्श्वभूमीवर, ‘समुद्रातून एक लोटा पाणी काढले म्हणून काही फरक पडत नाही, भाजप महासागर आहे’ या भाजप नेत्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते काँग्रेसला मिळणाऱ्या जनप्रतिसादावरून अस्वस्थ झाले आहेत. त्यातून आलेल्या नैराश्यातूनच ते अशी विधाने करत आहेत. सत्ताकाळात त्यांनी राज्यात काय विकास केला हे सांगावे. गरिबांसाठी किती घरे बांधली?, त्यांना किती तांदूळ दिले?, किती पाटबंधारे योजना राबविल्या, मेकेदाटू, म्हादई पूर्ण केले का? हे सांगावे. ते सोडून मी लिंगायतांच्या विरोधात बोललो, त्यांचा अवमान केल्याची अफवा ते पसरवत आहेत अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेस सत्तेत आल्यावर लिंगायत मुख्यमंत्री करणार का या प्रश्नावर, पक्ष आणि निवडून आलेले आमदार याबाबत निर्णय घेतील असे सिद्दरामय्या यांनी सांगितले. यावेळी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, लक्ष्मण सवदी, गोकाकमधील काँग्रेस उमेदवार डॉ. महांतेश कडाडी आदी उपस्थित होते.

Tags: