काँग्रेससाठी केलेल्या कामाची दखल घेऊन मला उमेदवारी देण्यात आली आहे. त्याबद्दल पक्षाचा मी आभारी आहे अशी प्रतिक्रिया बेळगाव उत्तरमधून तिकीट जाहीर झालेले काँग्रेसचे उमेदवारी आसिफ उर्फ राजू सेठ यांनी दिली. बेळगाव शहराचा विकास करण्यावर भर देऊन प्रचार करणार आहे असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसने तिसरी उमेदवारी यादी जाहीर करताना माजी आमदार फिरोज सेठ यांचे बंधू आणि काँग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष आसिफ सेठ यांना बेळगाव उत्तरमधून उमेदवारी जाहीर केली आहे. त्याबद्दल आसिफ सेठ यांनी आनंद व्यक्त केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटक प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला, विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या, केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, काँग्रेस सरचिटणीस विश्वनाथ, कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या पाठिंब्यामुळे मला उत्तर मतदार संघातून उमेदवारी मिळाली आहे. त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. बेळगाव उत्तरचा आमदार म्हणून बंधू फिरोज सेठ यांनी 2008-18 या काळात अनेक विकासकामे राबवून मतदार संघाचा कायापालट केला आहे. त्यांनी दिलेल्या सल्ला-मार्गदर्शनानुसार काम करणार आहे. पक्षाच्या ध्येय धोरणांनुसार, प्रचार करणार आहे. मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेणार आहे. गेल्या 5 वर्षांत काहीच विकास झालेला नाही. तो करण्यासाठी निवडून देण्याचे आवाहन मतदारांना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना माजी आमदार फिरोज सेठ यांनी सांगितले की, बंधू आसिफ सेठ यांना उमेदवारी देण्याची शिफारस मी केली होती. त्याखेरीज त्यांचा जनसंपर्क, पक्षासाठी तसेच जीवाची पर्वा न करता लोकांसाठी केलेलं काम लक्षात घेऊन काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली याचा आनंद झाला आहे. राज्य आणि देशातील भ्रष्ट भाजप सरकार जाण्याची वेळ आता आली आहे. कर्नाटकापासून भाजपच्या अधःपतनाला सुरुवात होणार आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी प्रियंका गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा आपल्यावर आशीर्वाद आहे. बेळगाव जिल्ह्यात पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी खर्गे यांनी माझ्यावर सोपवली हे माझे भाग्य आहे. आता जिल्ह्यात दौरे करून पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सेठ यांच्या चाहते व समर्थकांनी आसिफ उर्फ राजू सेठ यांची भेट घेऊन उमेदवारी मिळाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.


Recent Comments