Belagavi

“युज अँड थ्रो” हे भाजपचे जुनेच धोरण : सिद्दरामय्या

Share

“युज अँड थ्रो” हे भाजपचे जुनेच धोरण आहे असे सांगत, लक्ष्मण सवदी ज्येष्ठ, अनुभवी नेते आहेत त्यांच्या काँग्रेसमध्ये येण्यामुळे पक्षाला फायदाच होईल असे विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या यांनी सांगितले.
बेळगावात सांबरा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना, लक्ष्मण सवदी काँग्रेसमध्ये आल्याने पक्षाला काय फायदा झालाय का या प्रश्नावर पक्षनेते सिद्दरामय्या म्हणाले की, 100% फायदा झाला आहे. सवदी जनाधार असलेले राज्यातील एक बडे नेते आहेत, त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला निश्चित फायदा होईल. निवडणुकीत पक्षाच्या विविध ठिकाणच्या उमेदवारांचा प्रचार ते करणार असल्याचे सिद्दरामय्या म्हणाले.

भाजपमधून ज्येष्ठ नेत्यांना निवृत्ती घेण्यास भाग पाडले जात आहे का या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना, हा नियम त्यांनी सर्वच नेत्यांना का लागू करू नये? मोदी 73 वर्षांचे आहेत, अमित शाह देखील ज्येष्ठ आहेत, त्यांनी का निवृत्ती घेऊ नये असा सवाल केला. लक्ष्मण सवदी , जगदीश शेट्टर भाजपसाठी एवढे झटले, ईश्वरप्पा रा. स्व. संघाचा इतका उदोउदो करत होते, मग त्यांना भाजपने तिकीट का नाकारले? असे विचारत भाजपची “युज अँड थ्रो” ही जुनीच पॉलिसी असल्याची टीका सिद्दरामय्या यांनी केली.

वरुणा मतदार संघात तुमच्या विरोधात व्ही. सोमण्णा रिंगणात आहेत त्याबाबत काय या प्रश्नावर, सोमण्णा यांना त्या मतदार संघात जनाधार नाही, त्यांना कोण तेथे मते देणार नाहीत. माझ्या विरोधात ते काढणार असतील तर लढू द्या, काय फरक पडतो? असा सवाल सिद्दरामय्या यांनी करत सोमण्णा यांची आपल्याला भीती नसल्याचे स्पष्ट केले.

बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके यांना भाजपने तिकीट नाकारले आहे. त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देणार का या प्रश्नावर, याबाबत आपल्याला माहिती नाही, ज्या विषयावर चर्चा झालेली नाही, त्यावर काय बोलणार असे सिद्दरामय्या म्हणाले.

Tags: