मी भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. गेल्या पाच वर्षांत बेळगाव उत्तर मतदारसंघात अनेक विकासकामे केली, सर्व जातीधर्मियांत सौहार्द राहील याची दक्षता घेतली. तरीही मला भाजपचे तिकीट मिळालेले नाही. पक्ष नेतृत्वाकडून याची दखल घेण्यात आली नसावी असे वाटते. येत्या रविवारपर्यंत वाट पाहून मी माझा निर्णय घेईन असे बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले.
शुक्रवारी शहरातील आंबेडकर पार्क येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. बेनके म्हणाले, भाजप हायकमांड आणि स्थानिक नेत्यांवर माझा विश्वास आहे. ते फेरविचार करून मला तिकीट देतील याची मी वाट पाहत आहे. गेली 30 वर्षे पक्ष संघटना मजबूत करण्याचे कार्य केले आहे. गेल्या पाच वर्षात मी खूप विकासकामे केली आहेत. उत्तर मतदार संघात एकही दगडफेकीची घटना घडलेली नाही. ते पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आले नसावे. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, मी भाजपमध्ये राहूनच काम करेन
माझ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात बेळगाव उत्तर मतदारसंघात कोणालाही अन्यायकारक वागणूक मिळालेली नाही. कोणी सांगावे, मी राजकारणातून निवृत्ती घेईन. तिकीट वाटपात हायकमांड गोंधळले आहे. ते निश्चित याचा फेरविचार करतील, असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
भाषेचे राजकारण करणारा मी कधीच नाही. मी सर्व समाज समान म्हणून पाहिला आहे. मला तिकीट का देण्यात आले नाही हे येथील लोकांना माहीत नाही. मला ते सर्व कठीण मार्गाने मिळाले. मला अजूनही कठीण वेळ आहे. मी हायकमांडला पटवून दिले आहे. तिकीट मिळेल असा विश्वास असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. येत्या रविवारपर्यंत मी पक्षाच्या निर्णयाची प्रतीक्षा करेन. रविवारी माझ्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चर्चा करेन. पक्षश्रेष्ठींनी निर्णय न बदलल्यास रविवारी माझा पुढील निर्णय जाहीर करेन असे आ. अनिल बेनके यांनी सांगितले.
एकंदर, गोंधळलेल्या पक्षनेतृत्वाने आपल्या कामगिरीची दखल न घेता उमेदवारी नाकारली, आता रविवारी कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपला अंतिम निर्णय घेईन असे आ. बेनके यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याबाबत फेरविचार न झाल्यास, त्यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.


Recent Comments