काँग्रेसच्या गॅरंटीकार्डची खिल्ली उडवणाऱ्या भाजपकडून काँग्रेसच्याच योजनांची कॉपी केली जात असल्याचा आरोप केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केला.
बेळगावातील काँग्रेस भवनात सोमवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डी. के. शिवकुमार म्हणाले, काँग्रेसचे गॅरंटीकार्ड पाहूनच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही सरकारच्या बाजूने घोषणा केली आहे. त्यांनी घाईघाईने महिला आणि मागासवर्गीयांसाठी अर्थसंकल्पात घोषणा केल्याचे ते म्हणाले.
याआधी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात महिला आणि तरुणांना अधिक सुविधा दिल्या जातील असे म्हटले होते. मात्र अद्याप कोणतेही आश्वासन दिलेले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
टिपू सुलतानच्या मृत्यूला दोन शतके उलटून गेली आहेत. मात्र भाजप इतिहासाचे विकृतीकरण करत आहे. उरीगौडा आणि नांजेगौडा यांच्या नावावर जातीय संघर्ष निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा मी निषेध करतो असे केपीसीसीचे अध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले.
भाजप पक्षाचे नेते इतिहास बदलून जनतेच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करत आहेत, ही उपरोधिक गोष्ट आहे. निर्मलानंद स्वामीजींनी याचा निषेध केला पाहिजे. सर्व समाजाच्या नेत्यांना बोलावून निषेध केला पाहिजे. तसेच सर्व धर्माच्या स्वामीजींनीही निषेध करण्याचे आवाहन त्यांनी केले.
चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकाला बोलवू नका, निर्मलानंद स्वामीजीनी त्याला मीटिंगसाठी बोलावले तर तो संपूर्ण समाजाचा अपमान केल्यासारखे आहे. संपूर्ण वक्कलिग समाजावर अन्याय केल्यासारखे आहे असे डीकेशी म्हणाले.


Recent Comments