आगामी निवडणुकीत कागवाड मतदारसंघासह राज्यात भाजपची सत्ता आणण्याचा वज्रनिर्धार करत ऐनापूर शहरात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपची जनसंकल्प यात्रा पार पडली.

ऐनापूर शहरात गुरुवारी भाजप पक्षाची जनसंकल्प यात्रेनिमित्त भव्य मिरवणुक काढण्यात आली. सर्वत्र भगवे झेंडे, पताका लावण्यात आल्या होत्या. पक्षध्वज घेऊन हजारो कार्यकर्ते या मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाले होते.
जनसंकल्प यात्रेला संबोधित करताना माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले की, देशाला पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे जगभरात सन्मान मिळाला आहे. राज्यात जनता निर्धार मोहीम सुरू झाली असून भाजप पक्षाचे 140 आमदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट आहे. ते लोकांच्या पाठिंब्याने साकार करू.

माजी मंत्री रमेश जारकीहोळी म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा खोटारड्यांचा पक्ष आहे, ज्या पक्षाने माझी फसवणूक केली, या पक्षाला कोणीही पाठिंबा देऊ नये, काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांनी राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये अनेक घोषणा केल्या, त्या पूर्ण झाल्यात का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशातील कार्याचेही त्यांनी कौतुक केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्यातील दुहेरी इंजिनाचे सरकार आजही तसेच आहे आणि भविष्यातही असेच असेल असे सांगितले.
मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या की, बसवराज बोम्माई यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुशासन दिले आहे, अनेक लोकाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी प्रत्येक घराघरात पोहोचून भाजपच्या कामगिरीबद्दल सर्वांना जागृत करण्याचे आवाहन केले.
आमदार श्रीमंत पाटील म्हणाले की, कागवाड मतदार संघातील जनतेने मला दिलेल्या सत्तेचा वापर जनतेसाठी करून विकासाचे सर्व प्रकल्प हाती घेतले आहेत. अजून काही कामे बाकी आहेत. पुन्हा मला आशीर्वाद द्या. कागवाड मतदार संघ एक मॉडेल मतदारसंघ करणे हे माझे ध्येय आहे, असे सांगून हजारो कार्यकर्त्यांनी भर उन्हात जनसंकल्प यात्रेत सहभागी होऊन त्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार मानले.
चिक्कोडी जिल्हा भाजप अध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली, उपाध्यक्ष विनायक बागडी, सचिव निंगाप्पा कोकळे, कागवाड मंडळचे अध्यक्ष तमन्ना पारशेट्टी, ऍड. अभयकुमार अकिवटे, शिवानंद पाटील, आर.एम.पाटील, दादा पाटील, राजेंद्र पोतदार, कागवाड मतदारसंघातील सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन संकल्प यात्रा यशस्वी केली


Recent Comments