Khanapur

2/3 बहुमताने निवडून द्या, कर्नाटकाला नंबर एकचे राज्य बनवू : राजनाथसिंह

Share

येत्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट 2/3 बहुमताने निवडून दिल्यास, संपूर्ण दक्षिण भारतात कर्नाटकाला नंबर एकचे राज्य बनवू अशी ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी दिली.

खानापूर तालुक्यातील नंदगड येथे भाजपच्या जनसंकल्प यात्रेचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याहस्ते उदघाटन केले. त्यानंतर बोलताना ते पुढे म्हणाले, कर्नाटक हा पौराणिकता आणि आधुनिकतेचा अनोखा संगम आहे. या राज्याला संत बसवण्णा, अक्कमहादेवी, आदिकवी पंप आणि रन्न यासारख्या महापुरुषांची धार्मिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरा आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्या ब्रिटिशांविरोधात लढ्याच्या आधीही स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतविणाऱ्या वीरराणी कित्तूर चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा, फील्ड मार्शल करिअप्पा, लान्सनायक के.हणमंतप्पा यांच्यासारख्या शूरवीरांच्या शौर्यपूर्ण परंपरा आहे. बेळगाव हे कर्नाटकचे मस्तक आहे.

येथे भाजपची विजय जनसंकल्प यात्रा घेण्याचा निर्णय स्तुत्य आहे. हा निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आदी भाजप नेत्यांचे यासाठी कौतुक केले पाहिजे. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग करून सक्रिय राजकारण सोडण्याचा निर्णय घेतल्यावर पंतप्रधान मोदी आणि भाजपने त्यांना पक्षाच्या सर्वोच्च निर्णय समितीवर, संसदीय मंडळावर सदस्य घेऊन त्यांच्या राजकीय अनुभवाचा आदर केला. त्यांच्याजागी अचूक निर्णय घेणारे, समर्थ नेते बसवराज बोम्मई यांची निवड करण्यात आली. कर्नाटकाची ही परंपरा पुढे नेण्यासाठी आणि राज्याचा विकास साधण्यासाठी येत्या निवडणुकीत भाजपला दोन तृतीयांश स्पष्ट बहुमताने निवडून द्या असे आवाहन राजनाथसिंह यांनी उपस्थित मतदारांना केले.

डबल इंजिन सरकारने कर्नाटकाचा सर्वांगीण विकास करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. कर्नाटकाचा सर्वांगीण विकास व्हावा ही पंतप्रधान मोदींची आंतरिक इच्छा, तळमळ आहे. म्हणूनच त्यांनी नुकतेच शिवमोग्गा येथे भव्य विमानतळाचे उदघाटन केले. महामार्ग, रेल्वेमार्गाच्या कामांना चालना दिली. काँग्रेसने सत्तेच्या 50-60 वर्षांत जितकी विकासकामे केली नाहीत, त्याच्या डबल कामे मोदींच्या नेतृत्वाखाली. भाजप सरकारने अवघ्या 9 वर्षांत देशात केली आहेत. ग्रामीण सडक योजनेत ग्रामीण रस्त्यांची आश्चर्यकारक कामे केली. 80 हजार किमी लांबीचे महामार्ग बांधले. या कामांचा कर्नाटकालाही फायदा झाला आहे. विकासाचा हा रथ असाच पुढे जाण्यासाठी येत्या निवडणुकीत कर्नाटकात पूर्ण बहुमताने नव्हे तर स्पष्ट 2/3 बहुमताने निवडून द्या असे आवाहन राजनाथसिंह यांनी केले.

तत्पूर्वी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्यात भाजप सरकारने केलेल्या विकासकामांचा आढावा घेऊन सत्ताकाळात कर्नाटकाचा सर्वांगीण विकास केल्याचा दावा केला. डबल इंजिन भाजप सरकारने देशांप्रमाणेच कर्नाटकाचाही समग्र विकास केला आहे. सुशासन दिले आहे. विकासाचे हे पर्व सुरु राहण्यासाठी आणि सुशासन मिळण्यासाठी येत्या निवडणुकीत राज्यात भाजपला प्रचंड बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन मुख्यमंत्री बोम्मई यांनी केले.

प्रारंभी तुतारीच्या निनादात संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याहस्ते पक्षध्वज उंचावून जनसंकल्प यात्रेअंतर्गत भाजपच्या विजयरथाला चालना देण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजप प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील, मंत्री गोविंद कारजोळ, बैरती बसवराज, शशिकला जोल्ले, विधान परिषद सदस्य रवीकुमार यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते.

Tags: