Kagawad

जुगुळमध्ये होणार आश्रम व समाजभवनासाठी पायाभरणी

Share

कागवाड तालुक्यातील जुगुळ गावात वेदांत केसरी श्री मल्लिकार्जुन गुरुदेवाश्रम ट्रस्ट व भाविक यांच्या वतीने आश्रम व समाज भवन उभारण्यात येणार असून शनिवारी इमारतीचा शिलान्यास होणार आहे. विजापूरच्या ज्ञानयोग आश्रमाचे अध्यक्ष बसवलिंग स्वामीजी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याचे आश्रम ट्रस्टचे उपाध्यक्ष गुरुगौडा पाटील यांनी सांगितले.

सिंदगी मठाचे शांतानंद स्वामीजी यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत गुरुगौडा पाटील यांनी सांगितले की, आश्रम उभारणी कार्यक्रमाचे उद्घाटन जुगुळ मल्लिकार्जुन गुरुदेवाश्रमाचे हर्षानंद स्वामीजी यांच्या हस्ते होणार आहे. पाहुणे म्हणून बालगाव गुरुदेवाश्रमाचे आत्मानंद स्वामीजी, घोडगिरी शिवानंद मठाचे मल्लय्या स्वामीजी, कागवाड मल्लिकार्जुन गुरुदेवाश्रमाचे यतीश्वरानंद स्वामीजी व धर्मादाय विभागाच्या मंत्री शशिकला जोल्ले, कागवाडचे आमदार पाटील, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आजी -माजी आमदार व स्वामीजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सिंदगी गुरुदेवाश्रमाचे शांतानंद स्वामीजी म्हणाले की, वेदांत केसरी श्री मल्लिकार्जुन महास्वामी यांचा कृष्णा नदीच्या काठी जुगुळ गावात आश्रम बांधण्याचा मानस होता. येथील भक्तांनी माणगंडू येथे एक एकर जागा विकत घेतली असून येथे सुसज्ज आश्रम बांधण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. कागवाड व परिसरातील वेदांतकेसरी श्री मल्लिकार्जुन स्वामीजी व सिद्धेश्वर स्वामीजी यांचे भक्त हा कार्यक्रम यशस्वी करून स्वामीजींचा मनोदय पूर्ण करतील.

मल्लिकार्जुन आश्रम ट्रस्टचे उपाध्यक्ष गुरुगौडा पाटील, सचिव विजयकुमार मिनाचे, निमंत्रक बाळागौडा पाटील, राजेंद्र कडोळे, भरत अम्मनगी, सतगौडा पाटील व आश्रमाचे सर्व निमंत्रक उपस्थित होते .

Tags: