Belagavi

2 फेब्रुवारीला राष्ट्रीय नरेगा कामगार दिन साजरा करा : कामगारांची बेळगावात निदर्शने

Share

सरकारी पातळीवर 2 फेब्रुवारीला राष्ट्रीय नरेगा कामगार दिन साजरा करण्याच्या मागणीसाठी नरेगा कामगारांनी बेळगाव जिल्हा पंचायतीसमोर जोरदार निदर्शने केली.

भारत सरकारची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (नरेगा) सुरु होऊन 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2 फेब्रुवारी 2005 रोजी देशात गोरगरीब बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय नरेगा दिन म्हणून साजरा केला पाहिजे. मात्र याबाबत सरकारकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही याच्या निषेधार्थ आणि नरेगा दिनाच्या मागणीसाठी बेळगाव जिल्हा पंचायतीसमोर नरेगा कामगारांनी निदर्शने केली. त्यानंतर मुख्यमंत्री, पंतप्रधानांच्या नावाचे निवेदन जिल्हा पंचायत सीईओ यांना देण्यात आले.

यावेळी बोलताना बेळगाव जिल्हा बांधकाम व अन्य कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऍड. एन. आर. लातूर म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या नरेगा मजुरांनी 02 फेब्रुवारी रोजी नरेगा दिन साजरा करावा, यासाठी जिल्हा पंचायत आवारात आंदोलन छेडले आहे. शासन गेल्या 18 वर्षांपासून नरेगा कामगार दिन साजरा न करता अन्याय करत आहे. विविध संघटनांचा दिवस साजरा केला जातो. जिल्ह्यात 11 लाखांहून अधिक नरेगा कामगार कार्यरत आहेत. परंतु सरकार त्यांच्या कोणत्याही मागण्या पूर्ण करण्यापासून मागे पडत आहे. लवकरात लवकर शासनाने नरेगा रोजंदारी व ५० टक्के बेरोजगार भत्ता कायद्यानुसार द्यावा. रोजंदारी मजुरांच्या प्रत्येक समस्येवर तातडीने विचार करून त्यावर योग्य तोडगा काढण्यात यावा व कामगारांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

जागृती महिला मंडळ आणि मजूदर नवनिर्माण संघाच्या अध्यक्षा शारदा दबडे म्हणाल्या की, केंद्र सरकार देशातील रोजगार हमी योजनेचे काम टप्प्याटप्प्याने संपविण्याचे काम करत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मागील वर्षाच्या तुलनेत अत्यंत कमी निधी दिला आहे. जो निधी दिला आहे, तो वेतनाची मागील थकबाकी देणे शक्य होणार नाही. ग्रामपंचायतीमध्ये मजुरी मागितली तर ते योग्य प्रतिसाद देत नाहीत. रोजंदारी मजुरांच्या

मागणीचा योग्य विचार न करता त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दैनंदिन रोजगार योग्य पद्धतीने देण्याकडे शासन लक्ष देत नाही, अशा समस्या सोडविण्यासाठी शासनाने वर्षानुवर्षे जादा पैसे द्यावेत. याशिवाय सध्याच्या सरकारने वेतनात ३३ टक्के कपात केली आहे. त्यामुळे देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात नरेगा वाचवण्यासाठी आंदोलन सुरू असून, सरकारने मजुरांच्या समस्यांचा विचार करून योग्य तोडगा काढण्याची कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी सरकारला केली.

यावेळी बोलताना नरेगा कामगारांचे नेते समाजसेवक शिवाजी कागणीकर म्हणाले की, गोरगरीब, कष्टकऱ्यांच्या श्रमाला, मेहनतीचे स्मरण करण्यासाठी 2 फेब्रुवारीला राष्ट्रीय नरेगा कामगार दिन साजरा करणे आवश्यक आहे. नरेगा कामगार हाताला काम द्या अशी मागणी करत आहेत. त्यांना योग्य काम देऊन न्याय देण्याचे काम सरकारने केले. पाहिजे असे त्यांनी सांगितले. बाईट
जिल्ह्यातील खानापूर, हुक्केरी, गोकाक आदी तालुक्यातील नरेगा मजूर मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

Tags: