Belagavi

मुंबईत 28 फेब्रुवारीला आझाद मैदानावरून धडकणार म.ए. समितीचा मोर्चा

Share

सीमाप्रश्नी दाखल खटल्याच्या युक्तिवादासाठी कर्नाटक सरकार जोरदार तयारी करत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. या पार्श्वभूमीवर निर्वाणीचा इशारा देण्यासाठी मुंबईत 28 फेब्रुवारीला आझाद मैदानावरून म.ए. समितीचा मोर्चा धडकणार आहे.

बेळगावात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झालेल्या बैठकीत येत्या 28 फेब्रुवारीला मुंबईतील आझाद मैदानावरून मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी बोलताना मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्यासाठी कर्नाटक सरकार सर्व बाजूने प्रयत्न करत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे चित्र आहे. या प्रश्नाचा एकदाचा सोक्षमोक्ष लागावा अशी प्रत्येक सीमावासियांच्या इच्छा आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी मोर्चा काढण्याची गरज आहे.

यावेळी खजिनदार प्रकाश मरगाळे, अध्यक्ष दीपक दळवी यांनीही विचार मांडले.

दरम्यान, बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना मनोहर किणेकर म्हणाले, गेली ६६ वर्षे आम्ही या प्रश्नासाठी लढतोय, गेली १८ वर्षे सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाचा खटला प्रलंबित आहे. आता कर्नाटक सरकार प्रभावी युक्तिवाद करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. मात्र महाराष्ट्राचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे निर्वाणीचा इशारा देण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी मुंबईत आझाद मैदानावरून भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात रेल्वेने सहभागी होणाऱ्यांची १० फेब्रुवारीपर्यंत तर स्वतःच्या वाहनांनी येणाऱ्या कार्यकर्त्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत म. ए. समितीकडे नावनोंदणी करायची आहे.

कार्यकर्त्यांना तेथे एक दिवस राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी आम्ही काही प्रमुख आधी जाऊन सर्वपक्षीयांना विनंती करणार आहोत. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी आ. मनोहर किणेकर यांनी केले.

एकंदर, सीमाप्रश्नी दाखल खटल्याच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ‘चलो कोल्हापूर’ नंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आता ‘चलो मुंबई’ची हाक देऊन महाराष्ट्राच्या राजधानीत सीमावासियांचा आवाज घुमवण्याचा निर्धार केला आहे.

Tags: