Banglore

बेघरांना स्वतःचे घरकुल देण्यास आमचे सरकार वचनबद्ध : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

Share

जनतेला वस्तुस्थितीची जाणीव करून देत राज्य सरकार कल्याणकारी योजना राबवत आहे. राज्यातील बेघर लोकांना जागेच्या उपलब्धतेनुसार स्वतःचे घरकुल देण्यास आमचे सरकार वचनबद्ध आहे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेंगळूर जिल्ह्यातील येलहंका तालुक्यातील अग्रहारपल्ली येथे 1 लाख बहुमजली बंगलोर गृहनिर्माण प्रकल्पाचे उद्घाटन करून लाभार्थ्यांना घरांचे वाटप केले. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, अवकाशात मुक्त संचार करणाऱ्या पक्ष्यांना देखील घरटे बांधून विसावा घेण्याची गरज भासते, ती माणसाला का वाटू नये? त्यामुळे समाजातील गोरगरिबांना, बेघरांना छोटे का असेना पण घर बांधून देण्याची जबाबदारी समाज आणि सरकारने घेतली पाहिजे. घरे बांधून देण्याच्या घोषणा खूप होतात. पण त्यासाठी लागणार पैसा, जागा उपलब्ध नसेल तर काय करायचे? त्यामुळे लोकांना वस्तुस्थितीची जाणीव करून देऊन योजना राबवाव्या लागतात. आमच्या सरकारने राज्यातील ग्रामीण भागातील बेघरांसाठी चार लाख आणि शहरी भागातील बेघरांसाठी एक लाख घरे अशी एकूण पाच लाख घरे बांधून देण्याचे उद्दिष्ट ठरवून त्यानुसार ही योजना पूर्णत्वास आणत आहोत असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.

पूर्वीच्या सरकारने वस्तुस्थितीचे भान न राखता घोषणा केल्या. आजही ते हताश मानसिकतेतून घरे देण्याच्या मोठमोठ्या घोषणा करताहेत. पण सर्वच समुदायांना, समाजाला सदाकाळ फसवत येत नाही. लोकही आता जागृत झाले आहेत. घोषणेत तथ्य काय आणि फसवं काय हे ते सगळं जाणतात असे सांगत बोम्मई यांनी काँग्रेस नाव न घेता टोला हाणला. सरकारी घरकुल योजना राबवताना जागेची टंचाई ही मोठी अडचण आहे. खासकरून शहरी भागात ती अधिक जाणवते. त्याचप्रमाणे महसूल कायद्यातील काही जाचक तरतुदींमुळेही अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक निर्बंध हटवून कायदा सोपा करून आवास योजना राबवण्यात येत आहेत असे बोम्मई यांनी सांगितले.

यावेळी गृहनिर्माण मंत्री व्ही. सोमन्ना, बीडीएचे अध्यक्ष एस.आर. विश्वनाथ, मंत्री नारायण गौडा, ब्राह्मण विकास महामंडळाचे अध्यक्ष सच्चिदानंद मूर्ती, माजी आमदार नागराज, गृहनिर्माण विभागाचे सचिव रविशंकर, बेंगळुरूचे जिल्हाधिकारी के.ए. दयानंद आदी उपस्थित होते

Tags: