Belagavi

दलित साहित्य आणि विचार लोकांपर्यंत पोहोचवा : केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी

Share

दलित साहित्याचे विचार समाजातील लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचत नाहीत, त्यामुळे दलित साहित्य आणि विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम झाले पाहिजे असे केपीसीसीचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

भारतीय दलित साहित्य अकादमीच्या कर्नाटक राज्य शाखेतर्फे शहरातील कुमार गंधर्व कला मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या दलित लेखक आणि विचारवंतांच्या चौथ्या राज्यस्तरीय संमेलनात ते विशेष निमंत्रित म्हणून बोलत होते. ते म्हणाले की, दलित साहित्यातील हुंकार समाजापर्यंत पोहोचला पाहिजे. दलित साहित्यातील विचार, तत्त्वे ही सामाजिक समस्यांवरील प्रभावी तोडगा ठरू शकतात. त्याची महती समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम साहित्यिक, दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.


भूतरामनहट्टी विरक्तमठ श्री शिवसिद्ध सोमेश्वर शिवाचार्य महास्वामींची उपस्थिती संमेलनाला लाभली. यावेळी भारतीय दलित साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एसपी सुमनाक्षर, अकादमीचे राष्ट्रीय समन्वयक सुभाष कानडे, राष्ट्रीय संघटन सचिव डॉ. सी. व्यंकटेश, चेलुवराजू, डॉ. एम. रामचंद्रप्पा यांच्यासह भारतीय दलित साहित्य अकादमी राज्य आणि जिल्हा शाखेचे पदाधिकारी आणि बेळगाव जिल्ह्यातील सर्व दलित संघटनांचे नेते सहभागी झाले होते.

Tags: