भारतीय जनता पक्षाच्या रयत मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक बेळगावात २९ व ३० जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे अशी माहिती राज्यसभा सदस्य खा. इरण्णा कडाडी यांनी दिली.
बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना कडाडी म्हणाले की, प्रामुख्याने दिल्ली किंवा राज्याच्या प्रमुख शहरात कार्यकारिणी बैठक घेतल्या जातात. परंतु आमच्या विनंतीनंतर पक्ष नेतृत्वाने प्रथमच बेळगावात कार्यकारिणी सभा घेण्यास परवानगी दिली आहे. या कार्यकारिणीत केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जारी केलेल्या कल्याणकारी योजनांवर चर्चा करण्यात येईल. देशभरातून आलेल्या भाजप रयत मोर्चा पदाधिकाऱ्यांची त्याविषयी मते-सूचना जाणून घेऊन त्यात काय वगळावे, काय नव्याने समाविष्ट करावे याबाबत सरकारला शिफारस करण्यात येईल. काही राजकीय निर्णयही घेण्यात येणार आहेत.
पीकविमा भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचा दावा फेटाळताना इरण्णा कडाडी म्हणाले, पीकविमा भरपाई ही संकल्पना देशात भाजपने सर्वप्रथम अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात राबवली. या योजनेची भौगोलिक व्याप्ती मोठी होती. ती कमी करून सर्व शेतकऱ्यांना लाभ होईल अशा पद्धतीने एका स्तरावर आणण्यात आली आहे. सर्वच त्रुटी एकदम कमी करणे अशक्य आहे. पण स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक पीक नुकसान भरपाई भाजपने दिली आहे असे ते म्हणाले. बेळगाव जिल्ह्यात काटामारी रोखण्यासाठी साखर कारखान्यांवर छापेमारी करण्यात आली, पण कोणत्या कारखान्याने किती काटामारी केली याचा तपशील का जाहीर केला नाही या प्रश्नावर, आतापर्यंत एकाही सरकारने कारखान्यात पाऊलही ठेवण्याचेही धाडस केले नव्हते, आमच्या सरकारने निदान छापे तरी मारले असे समर्थन इरण्णा कडाडी यांनी केले.
पत्रकार परिषदेला भाजप प्रदेश सरचिटणीस महेश टेंगिनकाई, आ. अनिल बेनके, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील, राज्य प्रवक्ते एम. बी. जिरली आदी उपस्थित होते.


Recent Comments