Khanapur

खानापूर येथे 10 फेब्रुवारीला भव्य कुस्ती स्पर्धा : के. पी. पाटील

Share

खानापूर तालुक्याच्या कुस्ती परंपरेचे जतन करून पैलवानांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता बरगाव क्रॉस जवळील के. पी. पाटील नगर येथील मैदानात कुस्तीचा आखाडा आयोजित करण्यात आला आहे. आपल्या 55 व्या वाढदिवसानिमित्त या भव्य कुस्ती स्पर्धा भरविल्याची माहिती कर्नाटक शिवसेनेचे प्रदेश उपाध्यक्ष के. पी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आजकाल कुस्तीचे आखाडे नसल्यामुळे कुस्तीप्रेमी चांगल्या क्रीडा मनोरंजनापासून वंचित असल्याचे त्यांनी सांगितले. वाढदिवसानिमित्त होणाऱ्या अनावश्यक खर्चात कपात करून कुस्तीची आवड असणाऱ्या शेतकऱ्यांनी अस्सल कुस्ती पहावी, युवकांना या पारंपरिक क्रीडाप्रकारात रस निर्माण व्हावा यासाठी या आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात कर्नाटक आणि महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीपटूंना आमंत्रित करण्यात येणार आहे. उर्वरित कुस्तीमध्ये स्थानिक कुस्तीपटूंना खेळ करण्याची परवानगी आहे. यावेळी विविध वजनी गटातील लहान मुले व युवकांच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

25 जानेवारीपर्यंत वजन व नाव नोंदणीसाठी के. पी. पाटील व नारायण घाडी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला नारायण घाडी, डी. एम. भोसले, अकिलसाब मुन्नोळी, अर्जुन देसाई, हनमंत गुरव, सुभाष पाटील, सुहास पाटील, हनमंत पाटील, मधुकर पाटील, राजाराम गुरव, रामचंद्र पाटील, नारायण राऊत, मनोहर निलजकर, मोहन गुरव आदी उपस्थित होते.

Tags: