रस्ते अपघात टाळणे ही सर्व नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यात बसचालकांची भूमिका मोठी आहे. कामाचा किंवा वैयक्तिक त्रास, चिंता याचा विचार न करता तणाव न घेता शांत डोक्याने वाहने चालवून कर्तव्य बजावल्याने रस्ते अपघात टाळता येतील असे मत डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांनी व्यक्त केले.
बेळगावात वायव्य कर्नाटक परिवहन मंडळातर्फे वाहतूक सुरक्षा सप्ताह आणि स्वछता पंधरवड्याचे उदघाटन करून बोलताना डीसीपी पी. व्ही. स्नेहा पुढे म्हणाल्या, प्रत्येकाला वैयक्तिक समस्या, चिंता असतात. तशाच त्या बसचालकांनाही असतात. पण त्यांचा विचार करत बस चालविल्याने अपघातांची शक्यता वाढते. बसचालकांना सेवेत घेण्याआधी संपूर्ण प्रशिक्षण दिलेले असते. त्याशिवाय दैनंदिन स्वरूपात वाहन कार्यशाळेतही वेगवेगळे प्रशिक्षण, सूचना दिल्या जातात. त्याच्या आधारे, आपण ३०-४० प्रवाशांना घेऊन जात आहोत, प्रवाशांचे जीव आपल्या हातात आहेत याची जाणीव ठेवून जबाबदारीने, जागरूकतेने बस चालवणे आवश्यक आहे असा कानमंत्र डीसीपी स्नेहा यांनी बसचालकांना दिला. त्याचप्रमाणे नियमांचे पालन करून वाहने चालवून अपघात टाळणे ही सर्वच नागरिकांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना परिवहन अधिकारी लमाणी म्हणाले, जगात युद्ध, दहशतवादी हल्ले, नैसर्गिक आपत्तींमध्ये होणाऱ्या मृत्यूंहून अधिक मृत्यू रस्ते अपघातात होतात. १९६६मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात मरण पावलेल्या सैनिकांची संख्या ३,३०० तर १९७१च्या युद्धात मरण पावलेल्यांची संख्या ३,४०० इतकी होती. परंतु भारतात वर्षाला सरासरी ५ लाख रस्ते अपघात होतात, त्यात बळी पडणाऱ्यांची संख्या दीड लाख आहे. अपघाती मृत्यूंचे प्रमाण इतके भयानक आहे. ते रोखण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. राज्य व केंद्र सरकार आपापल्या परीने उपाययोजना करत आहेत. वाहतूक नियम पाळून त्यांना साथ देण्याची गरज आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला प्रवास करणे अनिवार्य बनले आहे. पण दक्षता घेऊन जबाबदारीने वाहने चालविल्याने रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करता येईल असे लमाणी यांनी सांगितले.
प्रारंभी डीसीपी स्नेहा व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने रस्ते सुरक्षा सप्ताह आणि स्वच्छता पंधरवड्याचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय वाहतूक नियंत्रणाधिकारी पी. वाय. नायक होते. यावेळी आरटीओ शिवानंद मगदूम, श्री ऑर्थो अँड ट्रामा सेंटरचे चेअरमन डॉ. देवेगौडा आदी मान्यवर उपस्थित होते. आनंदकुमार यांनी प्रार्थना सादर केली. चेतन सानिकोप्प यांनी आभार मानले.


Recent Comments