बेळगाव मध्ये सुरु असलेल्या रोटरी अन्नोत्सवाला बेळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे . काल तिसऱ्या दिवशी तर रविवार असल्याने , प्रचंड गर्दी होती . आणि आलेल्या प्रत्येकाने या रोटरी अन्नोत्सवाचा आनंद लुटला


दोन वर्षाच्या कोरोनाच्या काळानंतर बेळगावकरांसहित अन्य महाराष्ट्र आणि गोव्यातील लोकांना खाद्य पर्वणी ठरणार रोटरी अन्नोत्सव यंदा तितक्याच उत्साहात सुरु आहे . यासाठी जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे . देशातील विविध ठिकाणचे अन्नपदार्थ , शिवाय शाकाहारी , तसेच चटकदार , चमचमीत मांसाहारी आणि मत्स्याहारी पदार्थांवर ताव मारण्यासाठी , काल रविवारी हजारो लोकांनी अन्नोत्सवाला भेट दिली आणि आपल्या जिभेचे चोचले पुरवले .
प्रत्येक स्टॉल वरुन सुटलेला पदार्थाचा घमघमीत वास ग्राहकांना आपल्याकडे खेचत होता . संडे स्पेशल फूड आणि त्यातच कितीतरी प्रकारचे पदार्थ असल्याने , ग्राहकांना आपल्या आवडीच्या पदार्थांवर आणि नवीन पदार्थांवर ताव मारायला मिळाला .शिवाय याच्या जोडीला मनोरंजनासाठी फ्युजन नाईट ह्या कार्यक्रमातील बहारदार हिंदी जुनी नवी गाणी तसेच वेस्टर्न म्युझिक यामुळे तर अन्नोत्सवाला येणाऱ्या प्रत्येकाचे जीभेबरोबरच कानदेखील तृप्त झाले .

अन्नोत्सवाबद्दल माहिती देताना रोटरीचे पराग भंडारी यांनी सांगितले कि आज रोटरी अन्नोत्सवाचा तिसरा दिवस आहे . आमच्या अपेक्षेहून कितीतरी अधिक प्रतिसाद लाभत आहे . पहिल्या दिवसापासूनच मोठ्या संख्येने लोक येत आहेत . त्यामुळे थोडीशी रहदारीची समस्या होत आहे . पार्किंगसाठी देखील आता आणखी जागा उपलब्ध करून दिली आहे . मात्र अन्नोत्सवासाठी येणाऱ्या ग्राहकांनी , गणेशपूर , मंडोळी या पर्यायी मार्गाचा अवलंब केला तर वाहतूक कोंडी होणार नाही .
अन्नोत्सवात आलेल्या खवय्यांच्या चेहऱ्यावर तृप्ती दिसत होती . आपल्या आवडीचे आणि कोकणातील ताजे माशाचे पदार्थांवर लोक तुटून पडत होते . यावेळी अन्नोत्सवात आलेल्या लोकांनी आपली मराठीशी संवाद साधत , आपली प्रतिक्रिया दिली .
एकंदर बेळगावमधील अन्नोत्सव ही बेळगावकरांसाठी पर्वणी ठरत आहे .


Recent Comments