Accident

यल्लम्मा देवीच्या भक्तांवर काळाचा घाला; बोलेरो झाडाला धडकून 6 भाविक ठार

Share

बेळगाव जिल्ह्यातील सुक्षेत्र यल्लम्मा देवस्थानकडे जाणाऱ्या भाविकांचे वाहन झाडाला आदळल्याने एकूण 6 भाविक ठार तर काही गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना बुधवारी रात्री उशिरा रामदुर्ग तालुक्यातील चिंचनूर गावातील विठ्ठल मंदिराजवळ घडली. दरम्यान, अपघातातील मृतांना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी शोक व्यक्त करून मदत जाहीर केली आहे.

या दुर्घटनेत जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील हुलकुंद येथील रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये हनुमव्वा नाकडी (25), दीपा (32), सविता (17), सुप्रीता (11), मारुती (42), इंदिरव्वा (24) यांचा समावेश आहे. हे सर्वजण बुधवारी मध्यरात्री सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगरावरील रेणुका-यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जात होते.

जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील चिंचनूर विठ्ठल मंदिराजवळ बुधवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. महिंद्रा बोलेरो गुड्स वाहन चालकाचे नियंत्रण सुटून वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडावर आदळल्याने हा अपघात झाला. त्यात ६ भाविक ठार तर सुमारे १६ जण जखमी झाले. जखमींवर गोकाक रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत असे बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी कटकोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी डॉ. संजीव पाटील यांनी रात्री भेट देऊन तपासणी केली.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची भरपाई देण्याची घोषणा जिल्हा पालक मंत्री गोविंदा कारजोळ यांनी केली. ते म्हणाले की, रामदुर्ग तालुक्यातील कटकोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंचनूरजवळ झालेल्या अपघातात मरण पावलेल्या सहा जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई दिली जाईल. महिंद्रा मालवाहू गाडीतून सहा जण सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जात होते. त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे मंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले. जखमींवर ते बरे होईपर्यंत योग्य उपचार करविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने हे भाविक सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी चालले होते. त्यावेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल.

Tags: