अथणी नगरपालिकेची निवडणूक संपून एक वर्ष होत आले तरी आजपर्यंत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना सत्ता मिळालेली नाही. त्यामुळे शहराचा विकास खुंटला असल्याचा आरोप करत नगरपरिषद सदस्यांनी काळ्या फिती लावून निषेध केला.

नगरपालिकेच्या आवारात सकाळी निदर्शने करताना सदस्य रावसाहेब ऐहोळे म्हणाले की, निवडून येऊन एक वर्ष झाले तरी सत्ता मिळालेली नाही, त्यामुळे प्रभागात विकासकामे नाही, कुठलेही प्रकल्प पुरेशा प्रमाणात राबवले जात नाहीत. मतदार आम्हाला प्रश्न विचारत आहेत. या सर्व समस्यांना सरकार थेट जबाबदार आहे. आमच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या तीव्र दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, निवडून आलेल्यांच्या हाती तत्काळ सत्ता देण्याची मागणी त्यांनी केली.

यावेळी काँग्रेस नेते गजानन मंगसुळी म्हणाले, शहराचा कारभार सुरळीत करण्यासाठी नगरसेवकांकडे सत्ता सोपवायला हवी होती, मात्र ही नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात जाईल, या भीतीने त्यांना येथे सत्ता मिळत नाही. लोकशाहीत निर्वाचित लोकप्रतिनिधींना अधिकार न देऊन भाजप सरकार लोकशाहीची पायमल्ली करत असून, भाजप सरकारने सत्तेचे विकेंद्रीकरण न करून जनतेचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला.
सिद्धार्थ सिंगे, प्रकाश पुजारी, नगरसेवक मल्लिकार्जुन बुटाळी, प्रमोद बिल्लूर, उदय सोळसी, विलीनराज यळमल्ले, रवी बदकंबी, सय्यदमीन गड्याळ, रमेश पवार, बीरप्पा यक्कांची, रियाज सनदी, बाबू खेमलापूर, विश्वनाथ गडेद, सचिन बुटाळी व इतर उपस्थित होते.


Recent Comments