वडेयरांच्या प्रभावामुळे जुन्या म्हैसूर प्रांत आर्थिकदृष्ट्या विकसित झाला, तेथे कन्नडचा विकास झाला, पण उत्तर कर्नाटकातील मुंबई प्रांतात पेशव्यांमुळे मराठी, कलबुर्गी विभागात निजामांमुळे उर्दूचा प्रभाव वाढला, कन्नडचा तितकासा विकास झाला नाही.” असे माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी सांगितले

चिक्कोडीतील सीएलई संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी भवन परिसरात आयोजित 15 व्या बेळगाव जिल्हा कन्नड साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना ते म्हणाले, उत्तर कर्नाटकात कन्नडचा विकास बेळ्ळारीतील वीरशैव विद्यावर्धक संघासह खासगी शैक्षणिक संस्थांच्या कार्यामुळे झाला. बागलकोटमध्ये बसवेश्वर विद्यावर्धक संघ, विजापूरमध्ये बीएलडीई आणि बेळगावमध्ये केएलई संस्थेमुळे झाला. सीमाभागात कन्नड भाषा टिकून राहावी, यासाठी लिंगायत मठही काम करत आहेत. एकीकरणानंतर सीमाभागात कन्नडची 50 टक्के वाढ झाली. पण कन्नडचे सत्ताकेंद्र असलेल्या बेंगळुरमध्ये कन्नड गरीब झाली आहे. असे असले तरी सीमाभागात कन्नडचे काम व्यापक आहे. ते करावेच लागेल. कन्नडचा विकास करण्यासाठी आपल्याला सीमाभागात कन्नड शाळा सुरु केल्या पाहिजेत असे ते म्हणाले.

चिक्कोडी नगराध्यक्ष प्रवीण कांबळे यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक सुब्राव एंटेतिनवर यांनी संपादित केलेल्या ‘गडी तेरू’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी केएलईचे संचालक महांतेश कवटगीमठ यांच्या हस्ते 10 हून अधिक कृतींचे प्रकाशन करण्यात आले. बेळगाव जिल्हा कन्नड साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी पंधराव्या संमेलनाचे अध्यक्ष चिंचणीचे अल्लमप्रभू स्वामीजी यांच्याकडे कन्नड ध्वज सुपूर्द केला आणि ते म्हणाले, नंजुडप्पा अहवाल कन्नड जनतेसाठी आहे. सीमाभागाचा प्रश्न सोडवण्यासाठी नंजुडप्पा अहवालाची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
गोकाकचे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रशेखर अक्की म्हणाले, कारदगा गावातील कन्नडीगांचं राज्याच्या प्रत्येक गावात कौतुक व्हायला हवं. चिंचणी श्रीप्रमाणेच मठाधिपतींनी कन्नड मेळावा घ्यावा. कन्नड कर्नाटकातच राहायचं असेल, तर इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत कन्नड माध्यमात शिक्षण अनिवार्य करावे. चिक्कोडी संपादना चरमूर्ती मठाच्या स्वामीजींच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात बेळगाव जिल्हा कसाप अध्यक्षा मंगला मेटगुड्ड, डॉ. दयानंद नूली, हेस्कॉमचे संचालक महेश भाते यांच्यासह कसापचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते. चिक्कोडी तालुका कसाप अध्यक्ष डॉ. सुरेश उक्कली यांनी स्वागत केले. सुधीर डोणवडे, शंकर एंटेतिनावर यांनी कथन केले. एम. वाय. मेणसिनकायी यांनी आभार मानले.
त्यापूर्वी राष्ट्रध्वज, राज्यध्वज आणि परिषद ध्वज फडकवण्यात आला. कन्नड आणि संस्कृती विभागाच्या सहकार्याने अल्लमप्रभू स्वामीजी आणि कन्नड माता भुवनेश्वरीदेवी यांची प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली. कुंभमेळ्यात शेकडो महिलांनी भाग घेतला. मिरवणुकीत शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कन्नड समर्थनार्थ घोषणा दिल्या.


Recent Comments