Chikkodi

बालसाहित्य संमेलनात झाला मायबोली मराठीचा जागर !

Share

आमुच्या नसानसांत वाहते मराठी’ हे बोल अक्षरशः खरे करत वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या २२व्या बालसाहित्य संमेलनात आज मायबोली मराठीचा जागर करण्यात आला. शानदार ग्रंथदिंडी आणि विविध सत्रांत पार पडलेल्या या संमेलनात बालप्रतिभेचा अनोखा आविष्कार पहायला मिळाला.

होय, सर्वत्र मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीने भारलेले वातावरण, सगळ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा ‘मी मराठी’चा अभिमान, बौद्धिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक विचारांचे आदान-प्रदान अशा भारदस्त वातावरणात वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीचे २२वे बालसाहित्य संमेलन आज बेळगावातील गोगटे रंगमंदिरातील कवयित्री शांता शेळके साहित्य नगरीत पार पडले. संमेलनाच्या प्रारंभी मराठी विद्यानिकेतनच्या आवारातून शानदार ग्रंथदिंडी काढण्यात आली.

संमेलनाचे उदघाटक बांधकाम व्यावसायिक आर. एम. चौगुले यांनी पूजन करून दिंडीला चालना दिली. मराठी विद्यानिकेतनचे विध्यार्थी-विद्यार्थिनी शुभ्र पारंपरिक पोशाखात टाळ वाजवीत भजन गात दिंडीत सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा महापुरुषांच्या वेशभूषा परिधान करून काही विध्यार्थी सहभागी झाले होते. दिंडीच्या अग्रभागी विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने सुंदर प्रात्यक्षिके सादर केली. फ्लो
संमेलनाच्या प्रारंभीच मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीतानंतर सुरेल आवाजात ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे मराठी अभिमान गीत सादर केले तेंव्हा सर्वच उपस्थितांच्या अंगावर मराठी अभिमानाचे रोमांच उभे राहिले.

त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण, साठे प्रबोधिनीचे सदस्य चिमणराव जाधव आणि दौलतराव राणे यांना मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली. प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर यांनी स्वागत केले. सौम्या पाखरे, कुशल गोरल, अथर्व गुरव या विध्यार्थ्यानी पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर उदघाटक आर. एम. चौगुले यांनी दीप प्रज्वलनाने बालसाहित्य संमेलनाचे उदघाटन करून संमेलनाला संबोधित केले. त्यानंतर कथाकथन, कवयित्री शांता शेळके यांच्यावर आधारित ‘शांतांजली’ हा काव्यगायन कार्यक्रम पार पडला. कवी संमेलनाच्या सत्रात बालकवींनी आपल्या काव्यरचना सादर केल्या.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना कागवाडच्या शिवानंद महाविद्यालयाचे प्रा. अशोक आलगोंडी यांनी विध्यार्थ्यांना साहित्याच्या विविध प्रकारांचे वाचन करून प्रतिभाशक्ती विकसित करण्याचे आवाहन केले. संमेलनातील विविध सत्रांचे सूत्रसंचालन अनुक्रमे शीतल बडमंजी, संजीवनी खंडागळे, बी. एम. पाटील, खटावकर, प्रसाद सावंत, इंद्रजित मोरे यांनी केले.
या बालसाहित्य संमेलनाला सुभाष ओऊळकर, प्रा. आनंद मेणसे, विजय हावळ, बेळगाव शहर परिसर तसेच बेळगाव व खानापूर तालुक्यातील विविध शाळांचे विध्यार्थी, शिक्षक, साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

marathi-bal-sahitya-sammelan/