Kagawad

जैन जागृती समाजाची प्राथमिक बैठक संपन्न

Share

कागवाड तालुक्यातील जैन अल्पसंख्याक समाजातील बांधवांना शासनाकडून पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने जैन जागृती परिषदेची प्राथमिक बैठक उगारमध्ये झाली.

शहरातील जैन समाज भवन येथे शनिवारी सायंकाळी कागवाड तालुका स्तरावरील सर्व गावातील जैन बांधवानी जैन जागृती मेळाव्याच्या बैठकीत सहभागी होऊन आपल्या समस्या मांडल्या.
श्री पद्मावती मंदिराचे धर्माधिकारी शितलगौडा पाटील यांनी जैन जागृती मेळाव्याबद्दल सांगितले , जैन समाज अल्पसंख्याक आहे. सरकारकडून समाजाला देण्यात येणारी मदत आणि सुविधा योग्यरित्या पोहोचत का नाही ? सरकारी पातळीवर सामाजिक कार्यकर्त्यांना दर्जा मिळत का नाही ?

त्यामुळे कागवाड तालुकास्तरावरील उगार , ऐनापुर , शेडबाळ, शिरगुप्पी यासह सर्व गावातील तरुणांनी जैन समाजाला एकत्र करण्याचे काम केले आहे. मेळाव्यामध्ये समस्यांवर चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी जैन समाज संघटनेची स्थापना करण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या जैन समाजाचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरजी या तीर्थक्षेत्राचे पर्यटन स्थळात रूपांतर करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाने घेतला आहे. सम्मेद शिखरजीमध्ये 20 तीर्थंकरांना मोक्ष प्राप्त झाला आहे.

अशा पवित्र परिसराला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणे हा समाजावर एक प्रकारचा अन्याय आहे. याला जैनांनी आपला विरोध कायम व्यक्त केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी हा निर्णय मागे घ्यावा, ही बाब केंद्र व राज्य सरकारचे मुख्यमंत्री व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी 21 डिसेंबर रोजी कागवाड येथे मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

समाजाचे नेते वकील अभय ऐकिवात , संजय कुचनुरे, टी.के.धोतरे, समाजाचे नेते ए.सी.पाटील, जिन्नाप्पा नांदणी , सुरेश चौघुले, कुमार मालगावे, शीतल मालगावे, रामचंद्र किल्लेदर, जयपाल येरंडोळे , बाहुबली कुसनाळे, प्रभू कुसनाळे, पाटील कुशाळे, सुरेश चौघुले. राजू दुग्गे, प्रवीण आलपन्नावर आदी जैन समाजाच्या उत्कर्षासाठी राबणारे महत्त्वाचे नेते आहेत.

जैन समाजाचा विस्तार तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरापर्यंत झाला असून आजवर समाजातील लोकांचा वापर राजकीय नेत्यांकडून त्यांच्या स्वार्थासाठी केला जात आहे . भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी याबाबत योग्य तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. संमेलन यशस्वी करण्यासाठी बाहुबली कुसनाळे, भूषण पाटील, यशवंत पाटील, आदिनाथ दानोल्ली, शीतल मालगावे यांनी विशेष परिश्रम घेतले. कागवाड तालुकास्तरावरील सर्व गावातील शेकडो समाजबांधव व युवक उपस्थित होते.

Tags:

jain-awareness-convetion-at-kagawad