Kalaburgi

एआयसीसी अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच खर्गे यांचे कलबुर्गीत भव्य स्वागत

Share

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांचे आज प्रथमच कलबुर्गी येथे आगमन झाले. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे होम ग्राउंडवर भव्य स्वागत केले. यावेळी झालेल्या पक्षाच्या भव्य मेळाव्यात खर्गे यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी राज्य आणि देशातील भ्रष्ट भाजप सरकार टाका उलथवून टाकण्याचे आवाहन पक्ष कार्यकर्ते आणि जनतेला केले.

एआयसीसी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज प्रथमच आपल्या कलबुर्गी जिल्ह्याला भेट दिली. यावेळी पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे विमानतळावर भव्य स्वागत करून मिरवणूक काढली. त्यानंतर झालेल्या कल्याण क्रांती मेळाव्यात काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला, केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या, कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, सलीम अहमद, आर. ध्रुवनारायण, ईश्वर खांड्रे यांच्यासह बिनीचे काँग्रेस नेते उपस्थित होते. खर्गे काँग्रेसचे एकनिष्ठ सैनिक असून, विकासाप्रती त्यांची विचारधारा लोककल्याणाची आहे, काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांच्या निवडीमुळे देशभरात काँग्रेसला समर्थ नेतृत्व मिळाले असून, पक्ष बळकट होण्यास मदत होणार आहे अशी प्रशंसा काँग्रेस नेत्यांनी केली. यावेळी राज्य काँग्रेसतर्फे खर्गे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.


कल्याण क्रांती मेळाव्याला संबोधित करताना एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी, राज्य आणि देशातील भाजपचे भ्रष्ट सरकार उलथवून टाकण्याचे आवाहन पक्ष कार्यकर्ते आणि जनतेला केले. भाजप हा गोरगरिबांच्या नव्हे तर केवळ निवडक लोकांच्या कल्याणासाठी काम करत आहे. त्यांच्या सत्ताकाळात देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. इंधन दरवाढ आणि महागाईने देशातील सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे देशाच्या आणि पक्षाच्या हितासाठी भाजपला सत्तेवरून पायउतार करण्याची गरज आहे. त्यासाठी आपसातील मतभेद, राजकारण याला थारा न देता जनतेत मिसळून काम करा, जनतेचे प्रश्न सोडवा, आणि लोकांचा विश्वास जिंकून पक्षाला सत्तेवर आणा असे आवाहन त्यांनी काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना केले.

एकंदर खर्गे यांच्या कलबुर्गी भेटीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या होम ग्राउंडवर झालेल्या या कल्याण क्रांती मेळाव्यात काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसून आले.

Tags: