अधिवेशनासाठी बेळगाव विमानतळावर उतरण्यापूर्वी, १९ डिसेंबरच्या आत मागास आयोगाचा अहवाल स्वीकारल्याची आणि पंचमसाली आरक्षणाची प्रक्रिया सुरु केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यानी करावी अन्यथा २२ डिसेंबर रोजी सुवर्णसौधला २५ लाख पंचमसाली घेराव घालतील असा इशारा कुडलसंगम पंचमसाली पीठाचे बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी दिला.

पंचमसाली समाजाला २-ए आरक्षण मिळावे या मागणीसाठी बैलहोंगल शहरात आज भव्य पंचमसाली मेळावा पार पडला. यावेळी पंचमसाली समाजाचे अनेक नेते व्यासपीठावर उपस्थित होते. हजारोंच्या संख्येने पंचमसाली समाजबांधव या मेळाव्याला उपस्थित होते.

मेळाव्यात अनेक पंचमसाली नेत्यांनी समाजाला २-ए आरक्षण देण्यात सरकार चालढकल करत असल्याचा आरोप केला. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या पंचमसालीना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तातडीने २-ए आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली.
मेळाव्याला संबोधित करताना कुडलसंगम पंचमसाली पीठाचे बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी राज्य सरकारने पंचमसाली समाजाला आरक्षण देण्यात विलंबाचे धोरण अवलंबल्याचा आरोप करून तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यानी आम्हाला आरक्षण देण्यावरून अनेकवेळा शब्द देऊनही तो फिरवला आहे. आता त्यांनी १९ डिसेंबरच्या आत कायमस्वरूपी राज्य मागास आयोगाचा अहवाल मागवून पंचमसाली समाजाला आरक्षण देण्याची घोषणा करावी. अन्यथा २२ डिसेंबर रोजी राज्यभरातील २५ लाख पंचमसाली सुवर्णसौधला घेराव घालून आपली ताकद सरकारला दाखवून देतील असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला.

मेळाव्याला लिंगायत पंचमसाली परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयानंद काशप्पण्णावर, विजापूरचे आ. बसनगौडा पाटील-यत्नाळ, माजी मंत्री ए. बी. पाटील, विनय कुलकर्णी, कित्तूरचे आ. महांतेश दौडगौडर, बेळगाव ग्रामीण आ. लक्ष्मी हेब्बाळकर, काडा अध्यक्ष विश्वनाथ पाटील, जेडीएस जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी, चिकोडी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली, आर. के. पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments