हुक्केरी तालुक्यातील करगुप्पी, यल्लापूर येथील ग्रामस्थांनी पाच्छापूरजवळील 141 रेल्वेगेट बंद करू नये, या मागणीसाठी आंदोलन केले.

हुबळी-घटप्रभा रेल्वे मार्गाचे रुंदीकरण व सुधारणेचे काम सध्या सुरू आहे. गेल्या अनेक दशकांपासून पाच्छापूरजवळील करगुप्पी व यल्लापूर ग्रामस्थ शेतीच्या कामासाठी व ऊस वाहतूक करण्यासाठी या मानव गेटमार्गे आपल्या शेतांत जात आहेत. मात्र हे गेट बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांना अडचण येत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच गेट खुले ठेवावे, अशी मागणी करत ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी निदर्शने केली.

याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेतकऱ्यांनी सांगितले की, आमच्या गावाची रेल्वे फाटकाजवळ सुमारे 350 एकर जमीन असून, पिढ्यानपिढ्या आम्ही याच मार्गावरून आमच्या शेतजमिनीत जातो. मात्र आता अचानक रेल्वे अधिकारी गेट बंद करून रस्ता अडवण्यासाठी पुढे झाले आहेत. याला आमचा विरोध आहे. या संदर्भात आम्ही तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांना आमच्या मागणीचे निवेदन दिले आहे.
दरम्यान, यासंदर्भात राज्यसभा सदस्यानी हुबळीच्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा करून अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.


Recent Comments