Education

एम. बी. पाटील यांच्या मदतीमुळे दोन गरीब विध्यार्थी होणार डॉक्टर !

Share

नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी कोट्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश मिळूनही आर्थिक अडचणीमुळे प्रवेशासाठी धडपडणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांना आर्थिक मदत करून केपीसीसी प्रचार समितीचे अध्यक्ष आणि बीएलडीई संस्थेचे अध्यक्ष आमदार एम. बी. पाटील एखाद्या देवदूतासारखे धावून आले आहेत.

 

होय, विजापूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील हुबनूर गावातील चनबसू माळी आणि सिद्धापूर गावातील शेम्मिर जातगार हे एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी आर्थिक अडचणींमुळे संघर्ष करत होते. या संदर्भात दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांनी एम. बी. पाटील यांची भेट घेऊन कैफियत मांडली. आमदारांनी लगेच प्रतिसाद देत विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक शुल्क देऊन मदत केली. त्यांच्या निवासस्थानी छोटेखानी कार्यक्रमात या दोन्ही विद्यार्थ्यांना एमबीबीएस प्रथम वर्षाचे महाविद्यालयीन आणि वसतिगृह शुल्क आणि इतर खर्च असा प्रत्येकी 4,07,196 रुपये मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच, चांगला अभ्यास करून बसवभूमीची शान आणि अभिमान वाढवा, असा कानमंत्र त्यांनी दिला. यावेळी विद्यार्थी चन्नबसूचे वडील आनंद माळी, शेम्मीरचे वडील मेहबुब जातगार, बी.एल.डी.ई. डीम्ड युनिव्हर्सिटीचे कुलसचिव डॉ. आर. व्ही. कुलकर्णी आणि बी.एल.डी.ई. मुख्य प्रशासकीय अधिकारी आर.बी.कोटनाळ उपस्थित होते.

हुबनूर येथील चन्नबसू माळी या विद्यार्थ्याने यावर प्रतिक्रिया दिली, माझे वडील आनंद माळी हे गरीब शेतकरी आहेत. नीट उत्तीर्ण असूनही माझ्या प्रवेशात अडचण येत होती. त्यामुळे गावातील नेते प्रशांत जंडे आणि आमच्या वडिलांनी आर्थिक समस्येमुळे आमदारांची भेट घेऊन अडचण सांगितली. त्यावर आ. एम. बी. पाटील यांनी लगेच प्रतिसाद दिला. सरकारी शाळेत खूप मेहनत करून आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मला सुल्या येथील व्यंकटेश्वरगौडा मेडिकल कॉलेजमध्ये जागा मिळाली. पण पैशाच्या समस्येमुळे मला प्रवेश घेणे कठीण झाले होते. डॉक्टर होण्याचे माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एम. बी. पाटील देवाच्या रूपात पुढे आले आहेत. आता माझे स्वप्न पूर्ण होत आहे. आमदार पाटील यांनी पहिला हप्ता म्हणून रु. 4 लाखांचा धनादेश दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लागणारी उर्वरित रक्कम हळूहळू दिली जाईल, असे सांगितले.

दुसरा विद्यार्थि शम्मीर जातगार याने सांगितले की, मी एस.एस.एल.सी. पर्यंत कन्नड माध्यमात सरकारी शाळेत शिकलो. मी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले. नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, मला बसवेश्वर मेडिकल कॉलेज, चित्रदुर्ग येथे एमबीबीएसला प्रवेश मिळाला. पण, गरीब कुटुंबातील असल्यामुळे आम्हाला पैशाची व्यवस्था करणे अवघड होते. आता एम. बी. पाटील यांनी देवदूताप्रमाणे धावून येत माझे स्वप्न साकार करत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्याचे वडील मेहबुब जातगार म्हणाले, शेतमजूर असल्याने मला माझ्या मुलाला डॉक्टर बनवणे शक्य नव्हते. पण एम. बी. पाटील यांनी आम्हाला मदत करून कधीही न विसरता येणारे मोठे उपकार केले आहेत. आपण आयुष्यभर त्यांचे ऋणी राहू, अशी भावना या पालकांनी व्यक्त केली.

याआधी अनेकांना एमबीबीएस होण्यासाठी मदत करणाऱ्या आ. एम. बी. पाटील यांनी आता पुन्हा दोन गरीब विद्यार्थ्यांना मदत करून आपल्या दानशूरपणाची प्रचिती दिली आहे. त्यामुळे दोन गरीब गुणी विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत झाली आहे.

 

Tags: