हुक्केरी शहरातील गजबरवाडी व मोकाशी गल्ली या शासकीय प्राथमिक व अंगणवाडी शाळा रस्त्यालगत असून शाळेला सुट्टीच्या वेळी मुले रस्त्यावरून जातात. त्यामुळे रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे धोका होण्याची शक्यता असल्याने शाळांना कंपाऊंड बांधण्याची सूचना माजी खासदार रमेश कत्ती यांनी अधिकाऱ्यांना केली.

हुक्केरीतील सरकारी शाळांमधील विध्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांना कंपाऊंड बांधण्याची मागणी गजबरवाडी येथील राजू मुजावर यांनी माजी खासदार रमेश कत्ती यांच्याकडे केली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर रमेश कत्ती यांनी क्षेत्र संसाधन अधिकारी एस. ए. पद्मन्ना यांना या ठिकाणी बोलावून हुक्केरी शहर व संकेश्वर शहर येथील शासकीय शाळांना कंपाऊंड भिंत बांधण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना केली.

गजबरवाडी येथील राजू मुजावर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, यापूर्वी अनेकवेळा एसडीएमसी सदस्यांनी अधिकाऱ्यांना शाळांना कंपाऊंड भिंत बांधण्याची विनंती केली, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. दिवंगत उमेश कत्ती यांच्या विशेष आवडीमुळे आमच्या शहरात उर्दू शाळा सुरू करण्यात आली, परंतु ती विकसित होत नाही असे ते म्हणाले.
नरेगा योजनेंतर्गत ग्रामीण तसेच शहर भागातील शासकीय शाळांसाठी शाळांना कंपाऊंड भिंत बांधण्यात येत आहे. मात्र हुक्केरी शहर व संकेश्वर शहराला ही योजना लागू होत नसल्याने शाळांच्या विकासासाठी विशेष निधी द्यावा, अशी मागणी नगरवासीयांकडून होत आहे.


Recent Comments