नगरोत्थान योजनेंतर्गत राज्य सरकारने चिक्कोडी नगरपालिकेला 8.50 कोटी रुपये अनुदान मंजूर केल्याचे पालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक जगदीश कवठगीमठ यांनी सांगितले.

चिक्कोडी नगरपालिकेच्या कार्यालयात आज शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना जगदीश कवठगीमठ म्हणाले की, या अनुदानाचा वापर चिक्कोडी शहराच्या विकासासाठी केला जाणार आहे. नगर विकास योजनेंतर्गत चिक्कोडीत नगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर खाऊकट्टा बांधण्यासाठी 40 लाख रुपये, एमकेके कन्व्हेन्शन हॉलच्या कंपाऊंड बांधकामासाठी 40 लाख रुपये, नाल्यांच्या बांधकामासाठी 4.33 कोटी रुपये, पथदिव्यांसाठी 34.80 लाख रुपये, वाल्मिकी समाज भवनाच्या बांधकामासाठी 14.18 लाख रुपये, जिम बिल्डिंगच्या बांधकामासाठी 15 लाख रुपये, पुलाच्या बांधकामासाठी 64.70 लाख रुपये, उद्यान व स्मशानभूमीच्या विकासासाठी 55.65 लाख रुपये आणि अन्य विविध विकास कामांसाठी रु. 152 कोटी रुपये असे एकूण 8.50 कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे. या निधीतून लवकरच ही विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले.
मंत्री शशिकला जोल्ले यांनी चिक्कोडीतील विविध मंदिरे व मशिदींना अनुदान देऊन शहराच्या विकासात हातभार लावला आहे. नगरोत्थान योजनेतून चिक्कोडी पालिकेला हा निधी मंजूर करण्यासाठी सहकार्य केलेले मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, विधान परिषदेचे माजी मुख्य व्हीप महांतेश कवटगीमठ, मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी, बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती आदींचे पालिकेतर्फे अभिनंदन करण्यात येणार असल्याचे जगदीश कवटगीमठ यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष प्रवीण कांबळे, उपाध्यक्ष संजय कवटगीमठ, सभापती आदम गणेशवाडी, सदस्य नागराज मेदार, संतोष जुगुळे, बाबू मिरजे, सिद्धप्पा डंगेर, सोमनाथ गवनाळे, संतोष टवळे, किरण येरंडोळे, विनायक तंगडी, प्रशांत काळींगे, पालिका मुख्याधिकारी डॉ. सुंदर रोगी आदी उपस्थित होते.


Recent Comments