केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या “हिंदू” शब्दाविषयीच्या विधानाचा चिक्कोडी येथे भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत निषेध केला.

चिक्कोडी जिल्हा भाजपच्या वतीने केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या “हिंदू” शब्दाविषयीच्या विधानाविरोधात चिक्कोडी येथे भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी मोर्चा काढून जोरदार आंदोलन छेडले. शहरातील बसव चौकापासून सुरू झालेल्या या मोर्चात सतीश जारकीहोळी यांच्या हिंदू विधानाविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी घोषणा देत संताप व्यक्त केला. बसवेश्वर चौकात मानवी साखळी करून रस्ता रोको करून निदर्शने करण्यात आली. त्यानंतर निदर्शक भाजप कार्यकर्त्यांनी चिक्कोडी येथील प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले. सतीश जारकीहोळी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन प्रांताधिकारी माधव गिते यांच्यामार्फत राज्यपालांना पाठविण्यात आले.

यावेळी बोलताना चिक्कोडी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली म्हणाले की, सतीश जारकीहोळी यांचे हिंदू धर्माविषयीचे वक्तव्य निंदनीय आहे. सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असून त्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी नगराध्यक्ष प्रवीण कांबळे, उपाध्यक्ष संजय कवटगीमठ, भाजप रयत मोर्चा उपाध्यक्ष दुंडाप्पा बेंडवाडे, शांभवी अश्वथपूर, सतीश अप्पाजीगोळ, बसवराज डोणेवडे, गजेंद्र जलपुरे, मल्लिकार्जुन खानगौडर, तम्मन्ना पारशेट्टी, रमजान मकानदार, अन्वर माडीवाले, जयानंद जाधव, अमर बोरगावे, नागराज मेदार, किरण एरंडोले, बाबू मिरजी, विनायक तंगडी, सिद्धप्पा डंगरे, विश्वनाथ कामगौडर यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments