अथणी भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि अपुरी बसव्यवस्था याविरोधात अथणी-कोट्टलगी राज्य महामार्गावरील रामतीर्थ क्रॉसजवळ, रामतीर्थ गावातील शेकडो विद्यार्थ्यांनी बस अडवून आंदोलन केले.

स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे रामतीर्थ चौकातून रामतीर्थ गावात बस पोहोचत नाही, बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना क्रॉसवरच उतरवले जाते, काहीवेळा या भागात बस पोहोचतच नाही, त्याचबरोबर रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे शाळा – महाविद्यालयातील विद्यार्थ्याना प्रवास करणे अडचणीचे ठरत असल्याची तक्रार आंदोलक विद्यार्थ्यांनी केली.

या आंदोलनाला काँग्रेस नेते गजानन मंगसुळी यांनी पाठिंबा दर्शवत स्थानिक लोकप्रतिनिधींविरोधात संतप्त सवाल उपस्थित केले. येथील रस्त्यांची झालेली दुरवस्था, शाळा – महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना याचा होणारा त्रास, अपूर्ण बससुविधा याकडे आमदार लक्ष का देत नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नागरिकांच्या या समस्येवर तोडगा निघाला नाही तर तीव्र लढा देण्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी शिवानंद गुड्डापूर, सदाशिव हिरेकुरबर, सोमनिंग हिरेकुरुबर, विठ्ठल बागेन्नावर, मल्लप्पा हिरेकुरुब, उमेश कांबळे, ककमरी, अथणी महाविद्यालयातील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते.


Recent Comments