केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदू शब्दावरून केलेल्या वादग्रस्त विधानावरून अनेक हिंदू संघटना संताप व्यक्त करत असून आमदार सतीश जारकीहोळी यांनी त्वरित माफी मागावी अशी मागणी कर्नाटक कारकुशल निगमचे अध्यक्ष मारुती अष्टगी यांनी केली.

यमकनमर्डी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सतीश जारकीहोळी यांनी केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त केला. हिंदू हा शब्द पारसी भाषेतून आला असून त्याचा अर्थ वाईट असल्याचे विधान सतीश जारकीहोळी यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे तमाम हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असून सतीश जारकीहोळी यांनी जाहीर माफी मागावी, तसेच राज्य प्रभारी सुरजेवाला आणि राज्य अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली, तसे न केल्यास बेळगाव जिल्ह्यात हिंदू संघटना आणि भारतीय जनता पक्षाच्यावतीने भव्य आंदोलन छेडण्यात येईल, आणि सतीश जारकीहोळी यांना आगामी निवडणुकीत योग्य धडा शिकवला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते रवी हांजी, इराण्णा गुरव, पिंटू केदनूरे, रमेश नाईक, शिद्दु पट्टणशेट्टी, प्रवीण मठपती, महादेव मस्ती, अक्षय शिंत्रे, संतोष मालाज, बालिश शिरणागी, अविनाश गुरव, केम्पन्न पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments