Raibag

रायबाग येथे कायदेविषयक जनजागृती अभियान

Share

कायद्याबाबत प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. कायदेविषयक किमान ज्ञान नसेल तर दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येतात, अशी प्रतिक्रिया सहायक सरकारी वकील शेखर बडगावे यांनी दिली.

रायबाग तालुक्यातील केम्पट्टी, नंदीकुरळी, नसलापूर आणि बावनसौंदत्ती या गावातील ग्रामपंचायतीत तालुका विधी सेवा समिती, वकील संघ आणि ग्राम पंचायतींच्या सहयोगाने कायद्याविषयक जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांचे सबलीकरण हा उपक्रम राबविण्यात आला होता. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर कायदेशीर सेवा समितीकडून माहिती घ्यावी, गरीब आणि महिलांच्या समस्या सोडविण्याच्या उद्देशाने मोफत कायदेशीर सेवा देण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. याचा लाभ ग्रामीण जनतेने घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी वकील सुधीर कळ्ळे यांनी जन्म-मृत्यू नोंदणी कायदा, वाहन कायदा, विधी सेवा समिती येथे उपलब्ध असलेल्या मोफत सेवेबाबत माहिती दिली.

यावेळी वकील एम एम कोटीवाले, एम एन नाईक, शाश्वतराव कदम, पीडीओ ए डी अन्सारी, दत्त सावंत, संगमेष न्यामगौड, नंदीकुरळी ग्राम पंचायत अध्यक्ष अमित जाधव, केम्पट्टी ग्राम पंचायत अध्यक्षा अक्कव्वा कांबळे, नसलापूर ग्राम पंचायत उपाध्यक्ष नेमिनाथ खोबरे, पृथ्वीराज जाधव, जयपाल बनवणे, सुभाष नाईक, महादेव कांबळे, राजू कांबळे, अनिल हंजे, सत्याप्पा बाणे आदींसह आशा कार्यकर्त्या, ग्राम पंचायत सदस्या आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags:

everyone-should-having-the-knowledge-of-law/