Kagawad

मंगसुळी येथील पुरातन मल्लिकार्जुन मंदिरात दीपोत्सव

Share

कागवाड तालुक्यातील मंगसुळी गावातील ४०० वर्षे पुरातन मल्लिकार्जुन मंदिरात दीपोत्सव कार्यक्रम आयोजिण्यात आला होता.

कागवाड तालुक्यातील मंगसुळी या गावातील सुमारे ४०० वर्षे पुरातन असलेल्या श्री मल्लिकार्जुन देवस्थानात बेळंकी शिवलिंग शिवाचार्य स्वामी, कवलगुडू मठाचे अमरेश्वर महाराज यांच्या दिव्य सानिध्यात भाविकांच्या उपस्थितीत लक्ष दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सोमवारी सायंकाळी मंगसुळी गावात आयोजिण्यात आलेल्या दीपोत्सव विधियुक्त तसेच भक्तिपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी बोलताना मल्लिकार्जुन देवस्थान जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष चिदानंद माळी बोलताना म्हणाले, पुरातन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी येथील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली १.५० कोटी रुपयांच्या वर्गणीतून जीर्णोद्धार करण्यात येत आहे. या देवस्थानात तिसऱ्यांदा हा लक्ष दीपोत्सव भक्तांच्या सहकार्यातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कवलगूड मठाचे अमरेश्वर महाराज बोलताना म्हणाले, दीपोत्सवासाठी पैशांची नाही तर भक्तीची आवश्यकता आहे. अंधार दूर सारून प्रकाशाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून मल्लिकार्जुन देवस्थानात तिसऱ्यांदा हा लक्ष दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या देवस्थानाच्या जीर्णोद्धारासाठी कोटी रुपयांच्या देणगीतून जीर्णोद्धार करण्यात येत असून यासाठी चिदानंद माळी आणि युवकांचे मोठे प्रयत्न असल्याचे अमरेश्वर महाराजांनी सांगितले

मिरज तालुक्यातील बेळंकी शिवलिंग शिवाचार्य स्वामी बोलताना म्हणाले, चंचल मनाला एकाग्र करण्यासाठी श्री मल्लिकार्जुन देवस्थानात आयोजिण्यात आलेला दीपोत्सव आपल्या हृदयातील अंधार दूर सारून एक नवा प्रकाश आणून देत आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी युवकांकडून होत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य रवींद्र पुजारी, सरकारी हायस्कुल एस डी एम सी अध्यक्ष अभय पाटील, पीकेपीएस अध्यक्ष पुंडलिक पाटील, दलित नेते संजय तळवलकर, मंदिर जीर्णोद्धार समिती सदस्य परशुराम माळी, संजय तेली, अशोक माळी, मल्लप्पा मगदूम, एस एम कामेरी, परशुराम सावंत, रमेश सदलगे आदींसह मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.

Tags:

kagawad lasha deepotsava