अथणी येथील कुमठळ्ळी फार्महाऊसमध्ये लांडगा शिरल्याच्या घटनेने एकच खळबळ माजली. बिबट्या आल्याच्या अफवेने शहरात भीतीचे वातावरण पसरले. मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दीड तास अथक प्रयत्न करून लांडग्याला जेरबंद केले. त्यामुळे सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला.

होय, आज सकाळी ७.०० वाजता बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहराच्या हद्दीत शिवयोगी नगर येथील कुमठळ्ळी फार्महाऊसमध्ये एक लांडगा दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी त्याला दुरूनच पाहिले आणि तो पसार झाल्याने बिबट्याच आल्याची अफवा सर्वत्र पसरली.

याबाबत माहिती मिळताच अथणी प्रादेशिक वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या सहकार्याने शोधमोहीम राबवून लांडग्याला सापळ्यात अडकवण्यात यश मिळविले.
याआधी बेळगाव, अथणी तसेच कागवाड तालुक्यातील आवरकोड येथे बिबट्या पकडण्याची कारवाई अयशस्वी ठरली आहे. कोकटनूर, कात्राळ, ऐनापूर, कृष्णा कित्तूर, सुत्तट्टी, मोळवाड, शेगुणसी या गावांमध्ये बिबट्या दिसल्याची अफवा पसरली होती. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पायाचे ठसे तपासले असता ते बिबट्याचे ठसे असल्याचे सांगितले होते. आता अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी यांच्या फार्महाऊसमध्ये शिरलेला लांडगा मात्र दीड तास मोहीम यशस्वीपणे राबवून पकडून जनतेची चिंता दूर केली.
याबाबत बोलताना वनाधिकारी प्रशांत गानिगेर म्हणाले की, अथणी तालुक्यात कुठेही बिबट्या आढळून आलेला नाही. जे पायाचे ठसे आढळले ते लांडग्याचे असून, वन्य प्राणी आढळल्यास कोणीही घाबरून न जाता वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी डीसीएफ अँथनी मरियप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली एसीएफ सुनीता निंबरगी, एस. ए. मुंजे, एम. व्ही. पाटील, एस. ए. बागी, एम. सी. चौगला, ए. आय. दलायत, आर. एम. होसट्टी, नागप्पा आचरत्ती, एस. एम. घाडी, सुरेश पाटील, मुरुगेश ठकन्नवर, रघु. जी. ठकन्नवर, सिद्धप्पा शिरूर आदींनी लांडगा पकडण्याच्या मोहिमेत भाग घेतला.


Recent Comments