Chikkodi

चिकोडीत अतिक्रमण हटाओ दरम्यान आ. गणेश हुक्केरी यांचा हायड्रामा!

Share

अतिक्रमण झालेल्या दुकानावर कारवाई करण्यासाठी आलेल्या नगरपालिका अधिकाऱ्यांच्या कारवाईला विरोध करत काँग्रेस आमदार गणेश हुक्केरी यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडल्याची घटना चिकोडी येथे घडली आहे.

चिकोडी येथील इराण्णा पुटाणी यांच्या दुकानाचे अतिक्रमण हटविण्यासाठी आलेल्या चिकोडी नगरपालिका अधिकाऱ्यांच्या कारवाईला विरोध करत चिकोडी येथील काँग्रेस आमदार गणेश हुक्केरी यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून सदर कारवाईला विरोध केला. राजकीय दबावापुढे झुकत अधिकाऱ्यांनीही सदर कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली असून आमदारांनी या कारवाईसंदर्भात कागपत्रे सादर करण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली.

दिवाळीच्या पूजेदरम्यान दुकानासमोर शेड मारण्याचे एकमेव कारण या अतिक्रमण हटाओ च्या मागे असून याबाबत सर्वप्रथम नोटीस जारी करणे गरजेचे होते. अशाप्रकारच्या कार्रवाईपूर्वी कायदेशीर नोटीस जारी करण्याची मागणी या दुकानाचे संचालक प्रफुल पुटाणी यांनी केली.

दिवाळीनिमित्त दुकानासमोर घालण्यात आलेल्या शेडवरून सुरु झालेला अतिक्रमण हटाओ प्रकारानंतर आमदारांनी केलेला विरोध पाहून नगरपालिका मुख्याधिकारी सुंदर रोगी यांनी युटर्न घेत दुकानाचे दर्शनी भागाचे झालेले नुकसान भरून देण्याची हमी दिली आहे.

यावेळी आमदार गणेश हुक्केरी यांनी अधिकाऱ्यांवर मात्र नाराजी आणि संताप व्यक्त केला. एखाद्याला अशाप्रकारे लक्ष्य करून हाती घेतलेली कारवाई हि अत्यंत चुकीची असून यासंदर्भात पूर्वसूचना, नोटीस अशा कोणत्याही नियमांचे पालन न करता कारवाई हाती घेतल्याबद्दल संताप व्यक्त केला. याबाबत नगरपालिकेत चर्चाही झाली नाही, अचानकपणे केलेल्या कारवाईमुळे आपल्याला इथे यावे लागल्याचे आमदार म्हणाले.

हा सारा गोंधळ सुरु असताना या परिसरातून मार्गस्थ होणाऱ्या रुग्णवाहिकेलाही अडचण निर्माण झाली. अधिकारी – आमदार – नगरपालिका कर्मचारी यांच्यातील गोंधळामुळे रुग्णवाहिकेला ताटकळत उभारावे लागले. आसपास रस्त्यावर लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी सुरु असलेला गोंधळ पाहून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना शेवटी पायी जाण्याची वेळ आली.

Tags:

mla-ganesh-hukkeri-opposed-to-shop-encroahment-highdrama-in-chikkodi/