Kagawad

मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील : आ. श्रीमंत पाटील

Share

कागवाड मतदार संघातील जनतेच्या प्रगतीसाठी आपण करत असलेल्या कामाबद्दल समाधान वाटत असल्याचे मत कागवाड मतदारसंघाचे आमदार श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केले.

गुरुवारी कागवाड मतदार संघातील संबरगी या गावातील अग्राणी पुलाला भेट दिल्यानंतर श्रीमंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आपल्या मतदार संघात अद्याप अनेक विकासकामे होणे बाकी असून आपल्या मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण परिश्रम घेत असल्याचे ते म्हणाले.

बंधाऱ्यामध्ये साचवलेल्या पाण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीमंत पाटील फाउंडेशनच्या वतीने बोटिंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. कागवाड मतदार संघात महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातून येणाऱ्या पावसाचे पाणी अडविण्यात आलेल्या अग्राणी येथील बंधाऱ्यावर आमदार श्रीमंत पाटील यांनीही बोटिंगच्या माध्यमातून जलविहार केला होता. येथील शेतकऱ्यांच्या मुलांना कारवार मध्ये जाऊन मनोरंजन करणे त्रासदायक असून याच भागात बंधारा निर्माण करून २ किलोमीटर पर्यंत पाणी अडविण्यात आले आहे. याच पाण्यात पोहण्याचा सराव देखील करण्यात येणार असून आपत्कालीन परिस्थितीत जनतेसाठी पोहणाऱ्या युवकांचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केला.

गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळ्याच्या दिवसात येथील जनतेचे पिण्याच्या पाण्याअभावी हाल होत आहेत. टँकरच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा येथे करण्यात येतो. मात्र आता अग्राणी बंधाऱ्यामार्फत पाण्याचा प्रश्नदेखील सुटत आहे. या भागात १५ लाख टन ऊस उत्पादन घेतले जाते. डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते बसवेश्वर सिंचन प्रकल्पही सुरु होईल, अशी माहिती आमदार श्रीमंत पाटील यांनी दिली

यावेळी या गावातील ज्येष्ठ राजकीय नेते अब्दुल मुल्ला यांनी आमदारांच्या कार्याचे कौतुक केले. कागवाड सारख्या नापीक भागात आमदारांच्या प्रयत्नामुळे पाण्याची व्यवस्था झाली असून यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी आर एम पाटील, डी के पवार, मरग्यापा मगदूम, एस आर कुंभार, शिवानंद तेली, शंकर निजगुणी आदींसह ग्राम पंचायत सदस्य तसेच भाजपचे कार्यकर्ते, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags:

kagwad shrimant patil