रायबाग तालुक्यातील कुडची मतदारसंघातील मुगळखोड सद्गुरू श्री यल्ललिंगेश्वर बृहन्मठ मुक्ती मंदिर येथे कर्नाटक सरकारच्या धर्मादाय खात्याच्या वतीने दिवाळी वसुबारसेनिमित्त लोककल्याणासाठी गोपूजा आयोजित केली होती.

धर्मादाय, हज आणि वक्फ मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले व मुरुघराजेंद्र महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली गोधूली लग्न मुहूर्तावर गोपूजेचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, देशाचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आपल्याकडे गायीची पूजा केली जाते. मंदिरे देशाच्या वारशात सर्वोच्च स्थानावर आहेत. सणासुदीमागे शास्त्रीय कारण आहे. जग बदलाकडे वाटचाल करत आहे. देश बदलण्याची गरज आहे. आपण गायीला माता म्हणून संबोधले पाहिजे. जग कितीही बदलले तरी देशाचा वारसा पुढे चालवायला हवा, असे त्यांनी सांगितले.
देशी गाईची जात वाचवण्यासाठी आणि गाईचे संरक्षण करण्यासाठी, प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात गायींचे संगोपन व्हावे, या दृष्टिकोनातून अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दिवाळी वसुबारसेनिमित्त राज्यातील 35 हजार मंदिरांमध्ये गोपूजा करण्यात आली आहे. लवकरच रायबागमध्ये 10 एकर परिसरात गोशाळा बांधण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी सिद्धराम शिवयोगी स्वामीजी, प्रांताधिकारी संतोष कामगौडा, धर्मादाय विभागाचे उपसंचालक एस. पी. जिरगाळे, तहसीलदार निसार बागवान, मुख्याधिकारी महेंद्र थिम्मानी, मारुती गोकाक, अप्पनगौडा पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments