Kittur

कित्तूरमध्ये कुशन दुकानाला आग; लाखोंचे साहित्य भस्मसात

Share

दिवाळी सणानिमित्त लावलेल्या फटाक्याची ठिणगी उडून कुशनच्या दुकानाला आग लागल्याने लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात झाले. ही घटना बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर शहरात काल रात्री उशिरा घडली.

होय, कित्तूर शहरातील शब्बीर बिडी यांच्या मालकीच्या कुशनच्या दुकानाला काल, सोमवारी रात्री उशिरा आग लागली. फटाके फोडताच ठिणगी उडून कुशन दुकानाला आग लागली. पाहता-पाहता आगीने तीव्र स्वरूप धारण केले. त्यामुळे सुमारे तीन लाख रुपये किमतीचे तयार कुशन आणि फर्निचर आदी साहित्य जळून खाक झाले. शब्बीर बिडी यांच्या शेजारील दुकानाच्या मालकाकडून सोमवारी रात्री दिवाळी पूजन करण्यात आले. त्यानंतर तो फटाके फोडत असतानाच शेजारील कुशनच्या दुकानावर ठिणगी पडली आणि ही आग लागली. आग विझवण्यासाठी गेलेल्या शब्बीर यांच्या हाता-पायाला आणि शरीराच्या इतर अवयवांना जखमा झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

कित्तूर शहरात कित्तूर उत्सवासोबतच दिवाळी सण साजरा करण्यात आला. या सेलिब्रेशनच्या दरम्यानच कुशनच्या दुकानाला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मालक शब्बीर बिडी यांचे कुटुंब खालच्या मजल्यावर राहत असून, गादीचे दुकान वरच्या मजल्यावर असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कित्तूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Tags:

cracker-attack-on-cushion-shop/