Agriculture

ऊस उत्पादकांसाठी दिवाळी सणही कडूच! दिवाळीतही धरणे आंदोलन

Share

आज दिवाळीचा पहिला दिवस.. प्रत्येकजण आपापल्या घरी दिवाळीचा सण साजरा करत असताना बेळगावमधील शेतकरी नेत्यांनी उसाला प्रतिटन ३५०० रुपये भाव जाहीर करण्याची मागणी करत पुन्हा आंदोलन छेडले.

साखर मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्प यांच्यासमवेत बैठक घेऊनही शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण झाले नाही. उसाला हमीभाव जाहीर करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी होत असून या मागणीकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत  संतप्त शेतकऱ्यांनी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेनेच्या नेतृत्वाखाली  सोमवारी दिवाळी सणाच्या दिवशी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी  राज्य सरकार आणि मुख्यमंत्री बोम्मई यांच्या विरोधात संताप व्यक्त केला.

यावेळी शेतकरी नेते राघवेंद्र नाईक बोलताना म्हणाले, दिवाळी सण असूनही साखर कारखानदारांकडून आपल्यावर अन्याय केला जात आहे. कित्तूर उत्सवाच्या औचित्याने मुख्यमंत्र्यांनी उसाला ३५०० रुपये दर जाहीर करावा. दिवाळी सणात ऊस उत्पादक शेतकरी समस्येत असून याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. आज आपण शांततेत आंदोलन करत आहोत. मात्र सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नाईक यांनी दिला.

 

शिवानंद मुगळीहाळ बोलताना म्हणाले, आज ऐन दिवाळी सणात शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. १५ ऑक्टोबरपायरन्ट चांगली बातमी देऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र शेतकऱ्यांची दिशाभूल मुख्यमंत्र्यांकडून केली जात असल्याचा आरोप मुगळीहाळ  यांनी केला. हे सरकार दिवाळखोर असून शुगर लॉबीला छेडल्यास आपली खुर्ची जाईल या दहशतीखाली सरकार कार्यरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

ऐन दिवाळी सणात देखील उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर देण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले असणं आता शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला  मुख्यमंत्री  बसवराज बोम्मई कसा प्रतिसाद देतात? ते पाहावे लागेल..

Tags: