कित्तूर येथे आयोजित चन्नम्मा कित्तूर उत्सव-2022 ला आज भव्य मिरवणुकीने सुरुवात झाली. कित्तूर कलमठचे राजयोगिंद्र स्वामीजी यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मात्र जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांची अनुपस्थिती यावेळी सर्वानाच खटकली.


बेंगळुरूपासून संपूर्ण राज्याचा प्रवास करून बैलहोंगल येथील चन्नम्मा समाधी येथून आलेल्या वीरज्योतीचे कित्तूर शहरातील चन्नम्मा वृत्त येथे स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, आमदार महांतेश दोड्डगौडर, महांतेश कौजलगी, जिल्हाधिकारी नितीश पाटील, जि.पं. सी. ई. ओ दर्शन एच. व्ही. आदी मान्यवरांनी राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उत्सव ध्वजारोहण करून मशाल स्वीकारली.
ज्योतीच्या स्वागतानंतर राजगुरू संस्थान मठ, कित्तूरचे मडीवाळ राजयोगिंद्र स्वामीजी यांनी लोककला वाहिनी सुरू केली. मयूर नृत्य, केरळ थीम नृत्य, चांदमडेले, पूजा नृत्य, नंदीध्वज, पद नृत्य, चित्तेमेळा, बाहुलीनृत्य, झांज पथक यासह विविध कला मंडळातील शेकडो कलावंतांनी कला प्रदर्शन केले.
लोकगीते गात, मंडळाने चन्नम्माच्या शौर्याचे आणि साहसाचे गुणगान गाऊन कित्तूरचे गतवैभव पुन्हा जिवंत केले. सालंकृत गजराजासह चन्नम्माजींची भव्य मिरवणूक कित्तूर शहरातील मुख्य रस्त्यांवरून सर्वांच्या साक्षीने जाण्याची ही पहिलीच वेळ होती. फ्लो
याबरोबरच विविध खात्यांच्या कामांची व प्रकल्पांची जनजागृती करणारे स्थिरफलक चित्ररथही या मिरवणुकीत सहभागी झाले होते. पूर्ण कुंभ घेतलेल्या शेकडो महिलांनी कलावाहिनीच्या दीपोत्सवात भर घातली. विविध कलासमूहांचे प्रदर्शन पाहण्यासाठी हजारो लोक रस्त्याच्या दुतर्फा जमले होते.
याच प्रसंगी मान्यवरांनी कित्तूर महाद्वाराजवळील शूर संगोळ्ळी रायण्णा आणि आमटूर बाळाप्पा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
उत्सवाचा एक भाग म्हणून कित्तूर येथील गडासमर्डी येथे जिल्हाधिकारी नितीश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
एकंदरीत, कित्तूर उत्सवाला आज शानदार सुरुवात झाली. परंतु या भव्य मिरवणुकीच्या उद्घाटन ज्यांनी करण्याची अपेक्षा होती ते जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ हे मात्र अनुपस्थित होते. कित्तूर महोत्सवाचा उद्घाटन सोहळा आज सायंकाळी होणार आहे. किमान त्यावेळी तरी मंत्रीमहोदय सहभागी होऊन महोत्सवाच्या सौंदर्यात भर घालतील का, याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.


Recent Comments