Belagavi

बेळगावात पतंगाच्या मांज्याने घेतला 6 वर्षाच्या मुलाचा बळी

Share

दिवाळी सणासाठी कपडे घेऊन मामाला भेटून वडिलांसोबत गावी परतणाऱ्या कोवळ्या मुलाचा पतंगाच्या मांजाने बळी घेतला. ही दुर्दैवी घटना आज सायंकाळी बेळगावातील जुने गांधीनगर येथे घडली.

होय, दिवाळी सणानिमित्त बेळगावच्या बाजारपेठेत कपडे खरेदी करून वडगाव येथील मामाच्या घरी भेट देऊन नंतर वडिलांसोबत दुचाकीवरून आपल्या गावी, हुक्केरी तालुका हत्तरगी येथे जाणाऱ्या 6 वर्षीय बालकाचा घातक मांजाने बळी घेतला. गळ्यात पतंगाचा धारदार मांजा लागल्याने तो गंभीर जखमी झाला.

ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. वर्धन इरण्णा बाली असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. याप्रकरणी माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या कुटुंबाची दिवाळी आनंदात साजरी करायची होती, त्या कुटुंबावर मुलाच्या अशा दुर्दैवी मृत्यूने शोककळा पसरली आहे.

या मांजाच्या दोऱ्याने आतापर्यंत अनेक जीवांचा बळी घेतला आहे. या मांजा दोऱ्यावर तत्काळ बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. अन्यथा आणखी असेच निष्पाप जीव जात राहणार यात शंका नाही.

Tags: