Chikkodi

अतिवृष्टीग्रस्त भागाला आ. गणेश हुक्केरी यांची भेट

Share

चिक्कोडी-सदलगा मतदारसंघात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्‍वभूमीवर चिक्कोडी-सदलगा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये घरे, शेते, रस्ते पाणी साचले आहे. त्यामुळे आ. गणेश हुक्केरी यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाला भेट देऊन पाहणी केली.

काल, शनिवारी रात्री झालेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर व घरांमध्ये शिरल्याची माहिती मिळताच आमदार गणेश हुक्केरी यांनी रुपीनाळ, सिद्धापुरवाडी, काडापूर, अंकलीसह पूरग्रस्त गावांना तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांसह भेट दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

काढणीस आलेल्या मका व अन्य बागायती पिकांचे तसेच गेल्या दोन आठवड्यांपासून पेरलेल्या हरभरा, जोंधळा आणि इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे, सरकारने लवकरात लवकर पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य भरपाई देऊन पुन्हा शेती करण्यास प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

चिक्कोडी- सदलगा मतदारसंघ अंकली भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे चिक्कोडी-मिरज रस्त्यावर पाणी आल्याने अंकलीजवळील प्रवाशांना त्रास होत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मी भेट दिली आहे. लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री बी. सी.पाटील यांची भेट घेऊन पाणी जाण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी आणि प्रवाशांना त्रास होणार नाही अशी व्यवस्था करण्याची विनंती करणार असल्याचे आ. गणेश हुक्केरी यांनी सांगितले.

यावेळी चिक्कोडी तहसीलदार कुलकर्णी, मल्लिकार्जुन पाटील, रुपिनाळ, सिद्धापुरवाडी, काडापूर ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags:

chikkodi ganesh hukkeri visited flood places