16 वर्षीय निष्पाप कोवळ्या मुलाच्या हत्येचा निषेधार्थ बेळगावच्या शिवाजीनगर येथील रणरागिणी आणि रहिवाशी आज रस्त्यावर उतरले. आरोपींना त्वरित पकडून, फाशीची शिक्षा द्या, किंवा आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत त्यांनी पोलीस आयुक्तालयासमोर जोरदार निदर्शने केली.
होय, 20 ऑक्टोबर रोजी बेळगाव तालुक्यातील मुचंडी गावाजवळ छत्रपती शिवाजीनगर येथील 5 व्या गल्लीतील प्रज्वल शिवानंद करिगार या 16 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने संपूर्ण शिवाजीनगर हादरले. प्रज्वल शाळेतून परतत असताना काही हल्लेखोरांनी दुचाकीवर बसवून अपहरण केले. त्यानंतर मुचंडीजवळ त्याची निर्घृण हत्या करून मृतदेह टाकून पोबारा केला. या घटनेचा निषेध करत शिवाजीनगर येथील महिला आणि रहिवाशांनी आज शनिवारी शिवाजीनगर ते संगोळ्ळी रायण्णा सर्कल मार्गे शहर पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत भव्य निषेध मोर्चा काढला. एका चांगल्या निष्पाप मुलाची अशा प्रकारे निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच्या मारेकऱ्यांना शिवाजीनगरमध्ये आणून सोडा, त्यांना आमच्या हातात द्या, त्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी संतप्त शिवाजीनगर गल्लीतील महिलांनी यावेळी केली.
दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना निर्दशक महिलांनी सांगितले की, शाळेतून परतत असताना एका 16 वर्षीय मुलाची हत्या केली. आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा. यापुढे कोणत्याही मुलासोबत असे घडू नये. आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवायचे की नाही? कामावर जाऊन काम केले नाही तर आमचे पोट भरणार नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला. त्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या, अन्यथा आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांना शिक्षा करू, अशी मागणी त्यांनी केली.
या नंतर बोलताना श्री राम सेना हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, एकंदर परिस्थिती पाहिल्यास बेळगावात खून होणे नित्याचे झाले आहे. छोट्या-छोट्या कारणांवरून खुनाच्या घटना घडत आहेत. ही निर्घृण हत्या असून नराधमांना फाशी झालीच पाहिजे. तसेच विद्यार्थी व युवक गांजा, अंमली पदार्थ व इतर वाईट गोष्टींचे गुलाम होत आहेत. त्यामुळे अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, शिवाजीनगर येथील ज्येष्ठ नागरिक महादेव पवार म्हणाले, 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता शिवाजीनगर येथील पाचव्या गल्लीतील प्रज्वल शिवानंद करिगार याला शाळेतून नेऊन खून करण्यात आला. आम्हाला दुसऱ्या दिवशी हे कळलं. 16 वर्षीय मुलाच्या हत्येने संपूर्ण बेळगावला कलंक लागला आहे. आरोपींवर आणखी कठोर कलमे लावून कडक कायदेशीर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. दोन दिवसांत कठोर कारवाई न झाल्यास श्री राम सेना हिंदुस्थान संघटनेच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
या नंतर शिवाजीनगरमधील रहिवासी आणि खून झालेल्या प्रज्वलच्या कुटुंबीयांनी डीसीपी रवींद्र गडादी यांना निवेदन देऊन आरोपींना तत्काळ शोधून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. याप्रकरणी मारिहाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्याचा सापळा रचला आहे. एकंदरीत बेळगाव पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून आरोपींना जेरबंद केले पाहिजे.
Recent Comments