Hukkeri

हुक्केरीत पंचमसाली समाजाच्यावतीने भव्य मिरवणूक

Share

पंचमसाली समाजाला २ ए श्रेणीत आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज हुक्केरी येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. भव्य मिरवणूक, स्वागत कमानी आणि चारीबाजूनी हुक्केरी शहर फलकांच्या गराड्यात वाढल्याचे चित्र आज पाहायला मिळाले.

हुक्केरी शहरातील सर्व रस्ते आज स्वागतकमानी आणि भव्य बॅनरबाजींनी उजळून निघाले होते. एखाद्या सोहळ्याप्रमाणे बॅनर लावून सजविण्यात आलेल्या हुक्केरी शहरात प्रथम जगद्गुरु श्री बसवजय मृत्युंजय स्वामी यांच्या नेतृत्वाखाली पंचमसाली लिंगायत समाजाचा महामेळावा सुरु झाला आहे. या मेळाव्यात हजारो पंचमसाली समाजातील नागरिकांचा सहभाग असून मेळाव्याच्या प्रारंभी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत जगज्योती बसवेश्वरांची प्रतिमा असलेली वाहने, वाहनांसमोर असलेल्या महिला आणि कुडलसंगम गुरुपीठाचे बसवजयमृत्युंजय स्वामीजी यांचा सहभाग यामुळे सदर मिरवणूक भव्यदिव्य अशी पार पडली.

याबाबत इन न्यूजच्या आपली मराठीशी बोलताना कुडलसंगम गुरुपीठाचे बसवजयमृत्युंजय स्वामींनी पंचमसाली समाजाला २ए श्रेणीत आरक्षण मिळविण्यासाठी, पुढील संघर्षाच्या रूपरेषाविषयी अधिक माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी याआधीही ४ वेळा आश्वासन दिले मात्र ते पाळले नाही, यामुळे भव्य आंदोलनाची तयारी सुरु असल्याचे स्वामीजींनी सांगितले.

यानंतर बोलताना माजी मंत्री विनय कुलकर्णी म्हणाले, आज आरक्षणासाठी सुरू असलेल्या संघर्षात बालवृद्धांचा सहभाग आहे. सरकार आता आमचा आवाज दाबू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेले शब्द आता पूर्ण करण्याची वेळ आली असून त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी रविकांत पाटील बोलताना म्हणाले, पंचमसाली समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने छेडण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांनी मागासवर्गीयांसाठी न्याय दिला आहे. आणि ते आता आपल्या समाजालाही न्याय देतील, असा विश्वास आपल्याला असल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, पंचमसाली समाजावर वारंवार होणारा अन्याय हा निषेधार्थ आहे. पंचमसाली समाजाला आरक्षण देऊन आपल्या समाजातील गरिबांवर होणारा अन्याय टाळला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या मेळाव्यात विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनीही मनोगत व्यक्त केले. आपल्या समाजावर अन्याय होऊ देणार नाही, यासाठी आंदोलन सुरूच ठेवू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

यावेळी विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ, बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, माजी मंत्री ए.बी. पाटील, माजी मंत्री शशिकांत नाईक, व्ही.आय. पाटील, विनय कुलकर्णी, आमदार चन्नराज हट्टीहोळी आदी मान्यवरांचा सहभाग होता.

Tags:

hukkeri-panchamasali-procession