: कागवाड तालुक्यातील आदर्श गाव म्हणून परिचित असलेल्या शिरगुप्पी गावात शाळा सुधारणा, रस्ते विकास यासह विविध विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला. १.९४ कोटी रुपयांच्या निधीतून होत असलेल्या विकासकामांचा शुभारंभ आमदार श्रीमंत पाटील यांच्याहस्ते ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

सोमवारी कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी गावातील या विकासकामांसाठी ४८.५ लाख रुपयांच्या अनुदानातून शाळा खोल्या तसेच ९७ लाख रुपयांच्या अनुदानातून रस्ते विकासकाम हाती घेण्यात आले आहे. कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी या गावातील सरकारी हायस्कुलच्या नव्या २ वर्गखोल्यांची उभारणी ३१.५० लाख रुपयांच्या निधीतून करण्यात येत आहे. तसेच १७ लाख रुपयांच्या अनुदानातून अंगणवाडी केंद्र उभारण्यात येत आहे.
यावेळी आमदार श्रीमंत पाटील यांनी अधिकारी आणि ठेकेदारांनी यापूर्वी केलेल्या विकासकामांची पाहणी करत पुढील विकासकामे दर्जेदार पद्धतीने करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. यावेळी आमदार श्रीमंत पाटील यांच्याहस्ते अंगणवाडी केंद्राचे उदघाटन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांसमवेत आमदारांना खाऊवाटप करत त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा रंगविल्या. याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण केले. यानंतर शिरगुप्पी इंगळी व शिरगुप्पी उगार येथील रस्त्यांच्या विकास कामाचे भूमिपूजन केले.
यावेळी आमदार श्रीमंत पाटील बोलताना म्हणाले, कागवाड मतदारसंघात शिक्षणाला अधिक प्राधान्य देण्यात आले असून प्रत्येक गावात आवश्यक तितक्या शाळा खोल्या बांधण्यात येत आहेत. शिवाय शालेय आवारात विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, तसेच उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा अपर्णा पाटील, उपाध्यक्षा श्रुती कांबळे, अभय अकिवाटे, महावीर कात्राळे, रामगौडा पाटील, बोम्माण्णा चौगुले, सुभाष मोने, प्रकाश ढंग, अजित पुजारी, सचिन कांबळे, संतोष कितळे, मोहन जाधव, शुभम काटकर, गीतांजली चौगुले, कागवाड बीईओ एम आर मुंजे, सीडीपीओ संजीवकुमार सदलगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे इराण्णा वाली, मल्लिकार्जुन मगदूम, सहायक अभियंते अमर मेत्री, हायस्कुल मुख्याध्यापिका उज्वला मगदूम, पीडीओ शैलश्री बजंत्री आदींसह स्थानिक नेते, विविध विभागाचे अधिकारी, शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सुकुमार बन्नुरे, आपली मराठी, कागवाड


Recent Comments