हुक्केरी तालुक्यातील बडकुंद्री या गावातिक ४२ वर्षीय जवान शिवानंद बाबू शिरगावी यांचे श्रीनगर येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव बडकुंद्री गावात आणण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हुक्केरी तालुक्यातील शिवानंद बाबू शिरगावी हे श्रीनगर येथील ५५ आर आर बटालियनमध्ये कार्यरत होते. त्यांचे पार्थिव बडकुंद्री येथे आणल्यानंतर गावातील सरकारी शाळेच्या आवारात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. राज्य सरकारच्या वतीने हुक्केरी तालुका दंडाधिकारी डॉ. डी. एच. हुगार यांच्या उपस्थितीत त्यांना मानवंदना देण्यात आली.

बिडीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती, माजी मंत्री शशिकांत नाईक, बेळगाव डी ए आर पोलीस वरिष्ठाधिकारी काशप्पण्णावर, यमकनमर्डी पोलीस निरीक्षक रमेश छायागोळ आदींनी अंतिम दर्शन घेतले.
श्रीनगर येथे कार्यरत असणाऱ्या शिवानंद शिरगावी यांनी काही दिवसांपूर्वीच कुटुंबियांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आपण लवकरात लवकर येणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यांचे पार्थिवच घरी पोहोचल्याने कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला. शिवानंद शिरगावी यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
बडकुंद्री गावात शिवानंद शिरगावी यांच्या निधनाच्या वृत्तानंतर स्वयंघोषित बंद पुकारला होता. सर्व व्यवहार बंद करून ग्रामस्थांनी अंत्ययात्रेत सहभाग घेतला.


Recent Comments