बेळगाव तालुक्यातील सुळेभावी गावात दोन तरुणांची तलवारीने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेने सुळेभावी गाव हादरून गेले आहे.

होय, सुळेभावी गावात काल गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांनी दोन तरुणांची तलवारीसारख्या तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी गावातुन पलायन केले. सुळेभावी गावातील लक्ष्मी गल्लीत जुन्या वादातून रणधीर उर्फ महेश रामचंद्र मुरारी, वय 26 आणि प्रकाश हुंकारी पाटील, वय 24 यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस आयुक्त डॉ.बोरलिंगय्या, डीसीपी रवींद्र गडादी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

मारेकऱ्यांनी पूर्वनियोजित कट रचून दोघांची हत्या केल्याचा संशय आहे. एक मृतदेह सुळेभावीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर, तर दुसरा मृतदेह गणपती मंदिराजवळ आढळून आला. घटनास्थळी सापडलेल्या बाईकवर तिखटाची पावडर सापडली आहे. त्यामुळे डोळ्यात तिखट पावडर टाकून या तरुणांची हत्या केली असावी असा पोलिसांचा कयास आहे. गुन्ह्याच्या ठिकाणी, चप्पल पडलेल्या होत्या आणि दोन्ही मृतदेह 100 मीटर अंतराच्या आत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. हे पाहून दोघांचीही डोळ्यात चटणी पूड फेकून व तलवारीने वार करून हत्या केल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी दुचाकी जप्त करून तपासणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सुळेभावी येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हत्या झालेला महेश मुरारी 2019 मध्ये एका खुनाच्या प्रकरणात तुरुंगात गेला होता. जानेवारी 2019 मध्ये सुळेभावी गावातील बाजारगल्ली येथील नागेश मकल्यागोळ याची हत्या झाली होती. बांधकाम कामगार असलेल्या नागेशची बेळगाव तालुक्यातील होनिहाळ येथे धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेला महेश मुरारी नुकताच जामिनावर बाहेर आला होता. एरव्ही नेहमी शांत असलेल्या सुळेभावी गाव या दुहेरी हत्याकांडाने संपूर्णतः हादरले आहे. गावात पोलीस बंदोबस्त असून सध्या शांतता आहे.


Recent Comments