Athani

ऎगळी पोलीस स्थानक नूतन इमारतीचा उदघाटन समारंभ

Share

अथणी तालुक्यातील ऎगळी पोलीस स्थानकाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी यांच्याहस्ते पार पडला.

अनेक दिवसांपासून ऎगळी पोलीस स्थानकाच्या नूतन इमारतीसाठी मागणी होत होती. या मागणीला अनुसरून १ कोटी ७६ लाख रुपयांच्या खर्चातून नूतन इमारत बांधण्यात आली असून या इमारतीचे उदघाटन माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्याहस्ते पार पडले.

यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रास्ताविकात बोलताना एसपी डॉ. संजीव पाटील म्हणाले, १९६२ साली ऎगळी पोलीस स्थानकाची स्थापना करण्यात आली होती. या पोलीस स्थानकाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील एक जिल्ह्यासह, बागलकोट जिल्ह्यातील सावळगी, विजापूर जिल्ह्यातील होनवाड आणि बेळगाव जिल्ह्यातील काही सीमावर्ती भाग अशा चार जिल्ह्यांचा समावेश होता. कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण मंडळातर्फे यावर्षी बेळगाव जिल्ह्यात दहा नवीन पोलीस स्थानकाच्या इमारती बांधण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या उदघाटनानंतर बोलताना लक्ष्मण सवदी म्हणाले, गृह विभागाच्यावतीने आज नूतन इमारतीचे उदघाटन करण्यात आले असून १ कोटी ७६ लाख रुपयांच्या खर्चातून ही नवी इमारत उभी करण्यात आली आहे. आधीच्या पोलीस स्थानकात एक उपनिरीक्षक आणि एक पोलीस कर्मचारी असावा इतकीच क्षमता होती मात्र आता महिलांसाठी एक आणि पुरुषांसाठी एक अशी स्वतंत्र विभागाची व्यवस्था नूतन इमारतीत करण्यात आली आहे. कर्नाटकातील पोलीस दल अत्यंत सक्षम असून बेळगाव जिल्ह्यातील पोलीस मोठ्या कार्यक्षमतेने गुन्हेगार पकडतात तसेच जिल्ह्यात कोणताही गुन्हा घडला की गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी ते सतत कार्यरत असतात, असे लक्ष्मण सवदी म्हणाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार महेश कुमठळ्ळी हे होते. पोलीस उप अधीक्षक महालिंग नांदगावी, ग्राम पंचायत अध्यक्षा राजश्री पोलीस पाटील आदींसह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

Tags:

new police station inauguration