Nippani

‘आपली मराठी’ बातमीचा परिणाम : अखेर निपाणीत म. गांधींच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना

Share

निपाणी भागात असलेल्या महात्मा गांधी चौकासंदर्भात मागील वर्षी ‘आपली मराठी’ वाहिनीने वृत्त प्रसारित केले होते. केवळ गांधी चौक असे नाव मात्र महात्मा गांधींचा पुतळ्याचा पत्ताच नाही, शिवाय या चौकात पसरलेली अस्वच्छता, अंधार याबाबत ‘आपली मराठी’ने वृत्तांकन प्रसारित केले होते. याची दखल घेत यंदा या चौकात महात्मा गांधींच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

मागील वर्षी गांधी जयंती दिवशीच ‘आपली मराठी’ वाहिनीने गांधी चौकाच्या झालेल्या असुविधेबाबत सारा प्रकार उजेडात आणला होता. निपाणी नगरपालिका अखत्यारीत येणाऱ्या या गांधी चौकातील सर्वात जुना पुतळा कुठे गायब झाला याची माहिती कोणाकडेही नव्हती. वर्षानुवर्षे हा चौक पुतळ्याविनाच गांधी चौक या नावाने ओळखला जायचा. पुतळ्याविनाच नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संस्था याठिकाणी गांधी जयंती साजरी करायचे. अनेकवेळा याठिकाणी पुतळा स्थापन करण्यासाठी आंदोलने झाली. मात्र याकडे कोणत्याही अधिकाऱ्यांनी किंवा नगरपालिका प्रशासनाने लक्ष दिले नाही.

मागील वर्षी या चौकासंदर्भात ‘आपली मराठी’ने वृत्त प्रसारित केले आणि यंदा स्थानिक प्रशासनाने याची दखल घेत गांधी चौकात महात्मा गांधींच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली.

मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, निपाणी नगरपालिका अधिकारी, नगरपालिका पदाधिकारी या साऱ्यांनी एकत्रित येऊन याठिकाणी महात्मा गांधींच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली आहे. या चौकात आता महात्मा गांधींच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना झाली असून खऱ्या अर्थाने हा चौक महात्मा गांधी चौक म्हणून ओळखला जाणार आहे.

 

Tags:

nippani gandhi circle